लाचार, दुटप्पी शिवसेनेचा पुन्हा पर्दाफाश : खा. अशोक चव्हाण

लाचारदुटप्पी शिवसेनेचा पुन्हा पर्दाफाश : खा. अशोक चव्हाण

मुंबई : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेला भारत बंद महाराष्ट्रात १०० टक्के यशस्वी झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सरकारने जनतेच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता इंधनावरील अन्याय्य कर व अधिभार तात्काळ कमी करावेत, अशी मागणीही महाराष्ट्र त्यांनी केली आहे.

आंदोलनाची सांगता झाल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधीत करताना ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदमुळे सरकार घाबरले आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या काँग्रेस व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन काल रात्रीपासूनच स्थानबध्द करण्यात आले. पण सरकारच्या या दडपशाहीला झुगारून कार्यकर्ते व नागरिकांनी हा बंद यशस्वी केला. हे आंदोलन यशस्वी करणारे कार्यकर्ते आणि आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आभार मानले.

तत्पूर्वी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आ. नसीम खान आज सकाळी लोकल रेल्वेने माहिमवरून अंधेरी स्थानकात दाखल झाले आणि तिथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी सर्व नेत्यांना ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलीस ठाण्यात स्थानबध्द केले. सुमारे तीन तासांनी त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, आज महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, नागपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी आशिष दुआ, कोल्हापूरात आ. सतेज पाटील, चंद्रपूरमध्ये आ. विजय वडेट्टीवार, पुण्यात हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, तर औरंगाबादमध्ये सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली बंद पाळण्यात आला.

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे आमच्या हातात नाही, हे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे विधान म्हणजे केंद्र सरकारने महागाई कमी करण्याबाबत हात वर केल्यासारखेच आहे. सरकार चालवण्यात मोदी साफ अपयशी ठरले आहेत. हे सरकार पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर कमी करू शकत नाही, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असा हल्लाबोल करून खा. अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली.

शिवसेनेवरही त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले. सत्तेसाठी लाचार असल्याने शिवसेना आजच्या बंदमध्ये सहभागी झाली नाही. महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या जनसामान्यांपेक्षा शिवसेनेला सत्ता आणि मंत्रीपदे अधिक महत्त्वाची आहेत. शिवसेना फक्त तोंडपाटीलकी करते. त्यामुळेच ‘वाघ आता डरकाळ्या फोडत नाही, तर भुंकतो’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Previous articleखा. डाॅ. प्रितम मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण ; भाजपच्या कार्यकर्त्यांत सर्वत्र संतापाची लाट
Next articleआर्ची आणि परश्या झाले मनसे चित्रपट सेनेचे सदस्य