पंकजाताई मुंडे यांच्या राॅयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे थाटात आगमन
श्रीं ‘ ची उत्साहात झाली प्रतिष्ठापना
मुंबई राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या राॅयलस्टोन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आज मोठ्या थाटात आगमन झाले. पंकजा मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना केली.
पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीची प्रतिष्ठापना केली जाते. स्वतः पंकजा मुंडे या उत्सवाची सर्व तयारी करतात. गणपतीची मुर्ती आणण्यापासून ते त्याची स्थापना करण्यापर्यंत त्या स्वतः बारकाईने लक्ष घालतात, यावर्षी त्यांनी गणपतीची आरास अतिशय आकर्षक व सर्वांचे लक्ष वेधून घेणारी केली आहे. सकाळी विधीवत पूजनाने पंकजा मुंडे व डाॅ. अमित पालवे यांनी श्रीची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे, खा.डाॅ प्रितम मुंडे, गौरव खाडे, अॅड. यशःश्री मुंडे, आर्यमान पालवे, प्रभाकरराव पालवे आदी कुटूंबिय उपस्थित होते.
दरवर्षी बाबा ( गोपीनाथ मुंडे ) संपूर्ण कुटुंबासह माझ्याकडे श्रीगणेशाच्या दर्शनासाठी येत असत, आज माझी आई उपस्थित राहून बाबांची जागा आईने भरुन काढली याचा आनंद आहे असे पंकजा मुंडे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. आजच्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून महाराष्ट्र राज्यातील नागरीकांचे विघ्न दूर करण्यासाठी राज्य शासनाला बळमिळो तसेच चांगला पाऊस पडून पिक पाण्याने बळीराजा सुखी समाधानी होवो तसेच जाती पातीच्या भिंती झुगारून महाराष्ट्राच्या जनतेने विकासाचे पारडे जड करावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.