शाळा व शिक्षकांना भिकारी म्हणणा-या जावडेकरांनी माफी मागावी: खा. अशोक चव्हाण

शाळा व शिक्षकांना भिकारी म्हणणा-या जावडेकरांनी माफी मागावी: खा. अशोक चव्हाण

‘इंधनाचे दर’ व ‘राफेल’ हे विषय रावसाहेब दानवेंच्या समजण्यापलिकडचे

नाशिक : शाळा व शिक्षकांना भिकारी म्हणणा-या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करून त्यांनी या बेताल वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खा. चव्हाण आज नाशिकला आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, अस्तित्वात नसलेल्या जिओ इन्स्टिट्युटला हजारो कोटींची खैरात वाटणारे प्रकाश जावडेकर शाळांना व शिक्षकांना भिकारी म्हणत आहेत. शाळांना निधी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारकडून दिला जाणारा निधी हा देशातील जनतेने कररूपाने दिलेला पैसा आहे, जावडेकर यांच्या मालकीचा नाही. त्यामुळे जावडेकरांनी सरकारी निधीला स्वतःची मालमत्ता समजू नये. जावडेकर यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पदाला शोभणारे नसून त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.

रावसाहेब दानवे यांना अर्थकारण समजत नाही. पेट्रोलियम पदार्थाच्या किमती कशा ठरवतात ते माहित नाही. त्यामुळेच दानवे इंधनाच्या दराबाबत चुकीची वक्तव्ये करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती युपीए सरकारच्या काळापेक्षा कमी आहेत तरी तरीही देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती युपीएच्या काळापेक्षा जास्त आहेत. याचे कारण सरकारने इंधनावर लावलेले अन्याय्य कर आणि अधिभार आहेत. पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणून सरकारने जनतेची लूट थांबवावी अशी मागणी करून इंधनाच्या किंमती आणि राफेल विमान खरेदी घोटाळा या गोष्टी रावसाहेब दानवेंच्या समजण्यापलिकडच्या आहेत त्यांनी यासंदर्भात बोलू नये. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावे असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससह धर्मनिरपेक्ष, समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करणार आहे. भारिप बहुजन महासंघाला या महाआघाडीत सामील करून घेण्याची आमची मानसिकता आहे. भारिप बहुजन महासंघाने एमआयएम सोबत आघाडीबाबत घाई गडबडीत निर्णय घेऊ नये.

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleशरद पवारांच्या उपस्थितीत १ ऑक्टोबर रोजी बीडला राष्ट्रवादीचा विजय संकल्प मेळावा
Next article“त्या” वक्तव्याबद्दल रामदास आठवलेंनी व्यक्त केली दिलगिरी