‘जो बुँद से गयी वो हौदसे नही आती’: जयंत पाटील
मुंबई : राफेल व्यवहारात घोटाळा झाला आहे हे फ्रान्सचे माजी अध्यक्ष हॉलंद यांच्या खुलाशानंतर आता सिध्द झाले असून, भाजपा व नरेंद्र मोदी सरकारने आता कितीही खुलासे केले तरी ‘जो बुँद से गयी वो हौदसे नही आती’…अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मोदींवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
राफेल व्यवहारामध्ये फ्रान्सचे माजी अध्यक्ष हॉलंद यांनी खुलासा केल्यानंतर भाजप व मोदी सरकार आता अडचणीत आले आहे. राफेलबाबतच्या नव्या खुलाशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी यांना लक्ष्य केले आहे.
गेले काही महिने नरेंद्र मोदी सरकार गुप्ततेचे कारण पुढे करुन राफेलबाबतची माहिती मोठयाप्रमाणावर दडवत होती. या करारामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्सला जे हजारो कोटी रपयांचे राफेलचे स्पेअरपार्ट बनवण्याचे कंत्राट मिळणार होते.ते अचानक एका नव्याने स्थापन झालेल्या खासगी कंपनीला देण्यात आले.याबद्दल अत्यंत मोठया प्रमाणावर देशातील जनतेने प्रश्न उपस्थित केले. या खाजगी कंपनीने नंतर राफेलचा एक खिळासुध्दा आम्ही बनवणार नव्हतो अशा आशयाचा खुलासा केला. खासगी कंपनीच्या खुलाशानंतरही मोदी सरकार काहीही बोलायला तयार नव्हते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन केवळ मोठया आवेशात पत्रकारांना बाईट देण्यात व्यस्त होत्या. मात्र काल फ्रान्सचे माजी अध्यक्ष हॉलंद यांच्या प्रसिध्द झालेल्या खुलाशाने आता दुध का दुध व पानी का पानी झाले आहे असेही पाटील म्हणाले.
हॉलंद यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले की, भारत सरकारने कंत्राट करण्यासाठी केवळ रिलायन्स या एकमेव कंपनीचाच पर्याय फ्रान्ससमोर ठेवला होता. गेले काही महिने आम्ही यामध्ये काही काळंबेरं असल्याचे सांगत होतो तसेच देशातील जनताही याबद्दल प्रश्न विचारत होती. मात्र आता यामध्ये काळंबेरं असल्याचे सिध्द झाले आहे. हजारो कोटींचा घोटाळा करुन देशातील जनतेला कोण फसवतंय हे देशातील जनतेला कळून चुकले आहे असा टोलाही पाटील यांनी लगावला.