पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण

मुंबई :राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल विमान खरेदी सौद्याप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेची आणि देशातल्या १३० कोटी जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. तसेच देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणा-या सैनिकांचा अवमान केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला ढाल बनवून मोदी राफेल घोटाळा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्देवी आहे. मोदींचा भ्रष्ट चेहरा या प्रकरणातून समोर आला आहे. “चौकीदार ही भागीदार है।” हे ही सिध्द झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत व संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी करून या प्रकरणी काँग्रेस २७ सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, मोदींना देशहितापेक्षा त्यांच्या उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत, हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिध्द झाले आहे. देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल डील बदलली हे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस सरकारने एका राफेल विमानाची किंमत ५२६.१० कोटी निश्चित केली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींना सोबत घेऊन फ्रान्सला गेले व जुनी डील रद्द करून प्रति राफेल विमान १६७०.७ कोटी किंमत ठरवून राफेल खरेदीचा करार केला. या नव्या डीलमध्ये ४१ हजार २०५ कोटी रूपये जास्त मोजले. या बदल्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या १०-१२ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला ३० हजार कोटींचे ऑफसेट कंत्राट व १ लाख कोटींचे लाईफ सायकल कंत्राट दिले गेले. राफेल खरेदी व्यवहारात देशातील जनतेचे १ लाख ३० हजार कोटी रूपये मोदींनी अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला दिले आहेत हा घोटाळा आहे असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज महान राजे होते त्यांची तुलना कोणशाही होऊ शकत नाही मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करून महाराजांचा अवमान केला आहे. त्याच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करून योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी असे खा चव्हाण म्हणाले.
“डोंबिवली रेल्वे स्टेशनबाहेरील अस्वच्छतेमुळे मूड खराब होतो” असे वक्तव्य करून मध्य रेल्वेच्या डीआरएम ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा पोकळपणा उघड केला आहे. घनकचरा व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयानेही महाराष्ट्र सरकारला दंड ठोठावला होता. स्वच्छ भारतची घोषणा फक्त जाहिराती, भाषणे व फोटोशूट पुरतीच राहिली आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

शाळा कॉलेजांमधून सर्जीकल स्ट्राईक डे साजरा करण्याचे फर्मान मोदी सरकारने काढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सैनिकांच्या शौर्याचा स्वार्थासाठी व राजकीय फायद्यासाठी वापर सुरु केला आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. आपल्या एका सैनिकाचे सर पाकिस्तानी सैनिकांनी धडापासून वेगळे केले. काश्मीरमध्ये रोज सैनिक मारले जात आहेत. एक बदले १० सिर लायेंगे म्हणणारे 56 इंच छातीवाले पंतप्रधान गप्प का आहेत? या सरकारकडे काश्मीरबाबत कुठलेही ठोस धोरण नाही. भाजप सरकार सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करत आहे असे चव्हाण म्हणाले.

Previous article‘जो बुँद से गयी वो हौदसे नही आती’: जयंत पाटील
Next articleआम्ही अजून तव्यापर्यंत गेलोच नाही : शरद पवार