भाईंदरमधील प्रस्तावित मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव

भाईंदरमधील प्रस्तावित मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव

मुख्यमंत्र्यांची घोषणा

ठाणे : मीरा भाईंदरवासियांना दिलेल्या वचनांची पूर्तता करीत असून नुकतीच भाईंदरमध्ये मेट्रोसाठी मान्यता दिली आहे. येथील कस्तुरी गार्डन परिसरातील प्रस्तावित मेट्रो स्थानकाला महावीर स्वामी स्थानक असे नावही देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाईंदर येथे केली.

राष्ट्रसंत आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराज यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त कस्तुरी गार्डन येथे आयोजित गुरु उपकार स्मरण समारोहात ते बोलत होते. यावेळी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, आमदार नरेंद्र मेहता, आमदार मंगलप्रसाद लोढा, महापौर डिंपल मेहता, माजी महापौर गीता जैन आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराज यांना दीर्घायुआरोग्य चिंतिले. ते म्हणाले की, आचार्यजींच्या १०० व्या वाढदिवशीदेखील इथे महाराष्ट्रातच त्यांचा अनुग्रह आम्हाला मिळावा. समाजसेवा, राष्ट्रसेवा, जीवदया या विषयांमध्ये आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराज यांनी जे अजोड कार्य केले आहे ते आम्हा सर्वांसाठी प्रेरक असे आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, समस्त जैन समाजाने सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले आहे. देशाच्या प्रगतीत अमुल्य योगदान असलेल्या या समाजाने जेवढे लोकांकडून घेतले आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त समाजाला परत दिले आहे. आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली केरळ पूरग्रस्तांसाठी जैन समाजाने महाराष्ट्रातून करोडो रुपयांच्या साहित्याची मदत केली. केवळ मनुष्यच नव्हे तर ज्यात जीव आहे अशा सर्वांना वाचविण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी पूज्य आचार्यजींनी आम्हाला शिकवण दिली ती आम्ही लक्षात ठेवू.

याप्रसंगी भगवान महावीर यांची क्रिस्टलची एक मूर्ती मुख्यमंत्री आणि आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराज यांना देण्यात आली. तसेच काही धर्मग्रंथांचे प्रकाशनही करण्यात आले.

आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी यांनी १ लाख ६० हजार कि.मी. अशी पदयात्रा करून समाजात चेतना निर्माण केली तसेच मानवतेचा संदेश दिला. विविध मोर्चे, आंदोलने तसेच इतरही अनेक समस्या असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संतुलितरित्या कारभार चालविला आहे व राज्याला प्रगतीकडे नेले आहे असे गौरवोद्गार आचार्य नयपद्मसागरजी यांनी  काढले.

Previous articleआम्ही अजून तव्यापर्यंत गेलोच नाही : शरद पवार
Next articleसर्वांसाठी आरोग्य’ उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल