मुख्यमंत्र्यांनी घेतला सहा मंत्र्यांच्या कामाचा आढावा
मुंबई : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून सुरूवात केली आहे.आज एकूण सहा मंत्र्यांच्या गेल्या चार वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या आढाव्याच्या पहिल्या दिवशी उद्योग मंत्री सुभाष देसाई,गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या गेल्या चार वर्षातील कामाचा आढावा या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.या आढावा बैठकी वेळी संबंधित खात्यांचे राज्यमंत्रीही हजर होते. प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना आपल्या कारकीर्दीत जनतेवर प्रभाव टाकणारे कोणते महत्वाचे निर्णय घेतले याची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. आज झालेल्या आढावा बैठकीत मंत्री आणि संबंधित राज्यमंत्र्यांना वेगवेगळे बोलाविण्यात आल्याचे समजते. उर्वरित मंत्र्यांच्या कामाचा आढावा येत्या २८ तारखेपर्यंत घेतला जाणार आहे.