२७ सप्टेंबरला प्रदेश युवक काँग्रेसची राज्यस्तरीय निर्धार बैठक

२७ सप्टेंबरला प्रदेश युवक काँग्रेसची राज्यस्तरीय निर्धार बैठक

सत्यजित तांबे

युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या विधानसभा, जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नूतन कार्यकारिणीची राज्यस्तरीय निर्धार बैठक गुरुवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी मुंबईच्या मातोश्री बिर्ला सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना तांबे म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. भाजप सरकारने केंद्र आणि राज्यात युवकांची घोर निराशा केली आहे. नविन रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे. महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. शेतकरीही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हवालदिल झाला आहे. अशावेळी जनतेमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागृती करण्याचे काम युवकांना करावे लागणार आहे. सरकार विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी व युवकांना संघटनेसोबत जोडण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. राजीव सातव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावारू, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव, उपाध्यक्ष बी. श्रीनिवास, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले.

आदल्या दिवशी बुधवार,दिनांक २६ सप्टेंबर रोजी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी व जिल्हाध्यक्षांची स्वतंत्र बैठक टिळक भवन, दादर येथे होणार आहे. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पक्ष विस्ताराच्या कल्पना जाणून घेतल्या जाणार आहेत. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत असे तांबे म्हणाले.

Previous articleराज्यातील ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार
Next articleव्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ नाही