मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाणांविरोधात बलात्काराचा गुन्हा

मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाणांविरोधात बलात्काराचा गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

रत्नागिरी : संस्था अधिकाराचा गैरवापर करत संस्थेतील महिलेला लग्नाचे खोटे अमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते माजी आमदार आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण न्यायालयाच्या आदेशानुसार चिपळूण पोलीस स्थानकात फसवणुकीसह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

सन २००२ पासून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. यातील पिडीत महिलेने याबाबत वारंवार तक्रार अर्जही देऊन झाल्या प्रकाराबाबत न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजकीय वजन वापरून मधु चव्हाण यांनी प्रकरण दाबल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर पिडीत महिलेने थेट चिपळूण न्यायालयात धाव घेतली. चिपळूण न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकाराला वाचा फुटली. मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते अशी ओळख असलेल्या मधु चव्हाण यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या घटनेतील पिडीत महिलेने यापूर्वी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे वारंवार तक्रार अर्ज केले होते. २००२ पासून पिडीत महिलेचे शोषण सुरू होते. शैक्षणिक संस्थेच्या अधिकारांचा गैरवापर करून हा प्रकार सुरू झाला. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार पिडीत महिलेवर बलात्कार करण्यात आला. या विरोधात महिलेने वारंवार लेखी तक्रारीही केल्या. मात्र या तक्रारीची दखल घेतली  गेली नाही. सत्ताधारी पक्षातीलच एका बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप होत असल्याने पोलिसांनी चौकशीचा फार्स सुरु ठेवला होता. अनेक तक्रार अर्ज करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर त्या पिडीत महिलेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

या पिडीत महिलेची फसवणूक झाल्यानंतर त्या महिलेने चिपळूण न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत भाजपचे प्रवक्ते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूण न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर सा-यांचेच धाबे दणाणले. चिपळूण न्यायालयाच्या आदेशाविरोधात मधु चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र उच्च न्यायालयाने चिपळूण न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवताना अपील फेटाळून लावले. यानंतर मधु चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु झाली.

चिपळूण न्यायालयाने भाजपचे प्रवक्ते व मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३७६, ३५४, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूण पोलिसांना दिले. १५६/३ प्रमाणे न्यायालयाच्या आदेशानुसार चिपळूण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडवणारी ही घटना असून हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याबाबतची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठी वरिष्ठ स्तरावरुन खास आदेश बजावण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तास या प्रकाराबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. वरिष्ठ अधिका-यांची भेट घेतल्यानंतर या प्रकारावर शिक्कामोर्तब झाला. भाजपच्या एका बड्या नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालस्तरावरुन प्रयत्न झाल्याची चर्चा सुरु आहे. तसेच राज्यातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरु आहे.

कर्मचारी महिलेला खोट्या भुलथापा देऊन पत्नीचा दर्जा देतो अशी खोटी बतावणी केली होती. २००२ पासून हा सारा प्रकार सुरु होता. ती पिडीत महिला ५८ वर्षांची झाली तरी तिला पत्नीचा दर्जा मिळाला नाही. १५ वर्ष तिच्या इच्छेविरोधात शारिरीक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याचा प्रकार कोर्टाच्या आदेशाने उघडकीस आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी मधू चव्हाण यांनी आरोप करणारी महिला वारंवार खोट्या तक्रारी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

Previous articleनोकरीही नाही, छोकरीही नाही, मोदींनी तरुणांना फसवले- धनंजय मुंडे
Next articleयुती करायची की नाही याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा : मुनगंटीवार