शरद पवार यांच्या विधानाचा विपर्यास केला : मलिक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या राफेलबाबतच्या विधानाचा विपर्यास करून आणि चुकीच्या पद्धतीने वापरून गैरसमज निर्माण करण्याचे काम न्युज १८ लोकमत वाहिनी करत आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने शरद पवार यांच्या बाबत गैरसमज निर्माण करणारे वृत्त प्रसारित केले आहे. न्यूज १८ लोकमतचे संपादक उदय निडगुडकर यांनी काँग्रेसच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न विचारले असता, काँग्रेसपेक्षा निर्णय घेणाऱ्यांची(राफेलबाबत) विश्वासार्हता कमी झाली असल्याचे पवार यांनी म्हटल्याचे मलिक यांनी सांगितले. मात्र न्यूज १८ लोकमतने पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत चुकीची बातमी प्रसारित केली, तसेच विविध समाज माध्यमांवरही त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असा आरोप मलिक यांनी केला.
या मुलाखतीत शरद पवार यांना राफेल विमान खरेदीबाबत प्रश्न विचारला गेला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की, राफेलबाबत सरकारतर्फे कोणताही खुलासा केला जात नाही, त्यामुळे राफेलबाबत निर्णय घेणाऱ्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. राफेलबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. पक्षाची भूमिका स्पष्ट करत असताना मलिक म्हणाले की, या सर्व प्रकरणात सरकारने जॉईंट पार्लमेंट्री कमिटीची स्थापना करावी, विमानांच्या किमती का वाढल्या, एचएएल या कंपनीचे कंत्राट का रद्द केले याचा खुलासा करावा. बोफोर्स प्रकरणात तात्कालीन विरोधकांनी जसा खुलासा मागितला गेला होता तसा खुलासा सरकारने राफेल प्रकरणात करावा अशी मागणी मलिक यांनी केली