….तर राजकुमार बडोलेंना सांस्कृतिक कार्य मंत्रीही केले असते

….तर राजकुमार बडोलेंना सांस्कृतिक कार्य मंत्रीही केले असते

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे सुप्त कवी आहेत हे आधी माहित असते तर चार वर्षांपूर्वीच त्यांना सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीपद देतानाच सांस्कृतिक कार्य मंत्रीपदाचीही जबाबदारी दिली असती, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडोले यांच्या कार्याला प्रशस्तीपत्रच दिले.

सायनच्या षण्मुखानंद सभागृहात राजकुमार बडोले आणि त्यांच्या पत्नी शारदा बडोले यांनी शब्दबध्द केलेल्या ‘युगंधर’ या ऑडिओ सिडीचे तसेच ‘यु ट्युब चॅनेल’चे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी बडोलेंचे कौतुक केले.

ते म्हणाले, राजकुमार बडोले हे गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत, आणि आज त्यांचे नवे स्वरूप पहायला मिळाले ते म्हणजे ‘गीतकाराच्या’ रूपात. यापूर्वी अनेकदा त्यांच्या भाषणामधून काही कविता ऐकायला मिळाल्या मात्र त्यावेळी ते इतके चांगले कवी आणि गितकार आहेत याची कल्पना मला नव्हती. ही कल्पना जर असती तर चार वर्षांपूर्वीच सामाजिक न्याय खात्यासोबत सांस्कृतिक कार्य खातेही त्यांना दिले असते, असे ते म्हणाले.

बडोलेंच्या कवितांचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्तीच्या मनात संवेदना असतात त्याच व्यक्तीला कविता सुचते. शब्द उधार घेता येतात मात्र भावना कधी उधार घेता येत नाही, त्या आपल्याच असाव्या लागतात. म्हणून आपल्या जीवनात जे शिकले, अनुभवले ते कवितेच्या माध्यमातून बाहेर येते. कविमध्ये आणखी एक गुण असतो तो स्वतःच्या सुख-दुखः सोबत इतरांच्या सुख-दुखःची अनुभूती करतो, आणि आपल्या शब्दांमधून त्या भावना व्यक्त करू शकतो. इतराच्या सुख-दुखःची अनुभूती तसेच एकूणच बृहत समाजाच्या संवेदनांची अभिव्यक्ती करू शकतो. याचाच प्रत्यय बडोले पति-पत्नीच्या रूपाने येथे बघायला मिळाला, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.

‘युगंधर’ अल्बममधिल गितकार राजकुमार बडोले आणि शारदाताई बडोले यांच्या रचनांना आपल्या सुमधूर आणि भारदस्त स्वरांनी अविष्कारीत करणारे ज्येष्ठ गायक हरिहरन, शंकर महादेवन, मधुश्री, बेला शेंडे, आदर्श शिंदे, डॉ. अनिल खोब्रागडे, प्रसेनजीत कोसंबी आदींचे मुख्यमंत्र्यांनी भरभरून अभिनंदन केले. सोबतच सुप्रसिध्द संगीतकार भुपेश सवाई यांनाही विशेष धन्यवाद मुख्यमंत्र्यांनी दिले.

अब्लममधिल ही गीतं केवळ मनोरंजनाची गिते नसून यातील भावना आणि संदेश आपल्यापर्यंत पोहचतो. तथागत भगवान गौतम बुध्दांनी आपल्या तत्वज्ञानात संगीताला खूप मोठा दर्जा दिला होता. ते म्हणायचे संगीत हे मनोरंजनाचे साधन नाही तर ते एकाग्रचित्त होण्याचे साधन आहे. जीवन हे विणेच्या तारेसारखे आहे. ती खूप ताणली तर तुटते आणि अधिक सैल ठेवली तर बेसूर होते. त्यामुळे आपले जीवन अत्यंत माफक गरजांनी युक्त असायला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनात कधी दुखःची अनुभूती येत नाही. तथागतांच्या या विचारांना आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील समतेला प्रस्थापित करण्याचे काम बडोले पति-पत्नी गिताच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे असेही ते म्हणाले.

Previous articleशरद पवार यांच्या विधानाचा विपर्यास केला : मलिक
Next articleविरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या : नितीन गडकरी