विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या : नितीन गडकरी

विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या : नितीन गडकरी

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले सरकार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त असून भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली.

भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक बांद्रा येथे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीचे उद्घाटन करताना मा. नितीन गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री वी. सतीशजी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर व मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, अटलजी यांच्या व अनेक कार्यकर्त्यांच्या त्याग, परिश्रम व समर्पणामुळे भाजपा देशातील सत्ताधारी पक्ष झाला असून भाजपाला देशाचे भवितव्य घडविण्याची संधी मिळाली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गाव, गरीब, किसान यांचा विकास करण्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारचे विकासाचे काम विरोधकांना सहन होत नाही, त्यामुळेच ते जातीयवाद वाढविण्याचा व विकासाचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते म्हणाले की, राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस पक्ष आरोप करत आहे, पण रिलायन्सबरोबर राफेल विमान बनविणाऱ्या कंपनीचा करार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतानाच झाला होता. या कंपनीने रिलायन्सप्रमाणेच सुट्या भागांसाठी २२ कंपन्यांशी करार केला आहे. या करारांशी भाजपा सरकारचा काहीही संबंध नाही. मोदी सरकारने यशस्वी वाटाघाटी केल्यामुळे सुसज्ज लढाऊ विमाने चाळीस टक्के स्वस्त मिळाली आहेत. या विषयातील सर्व माहिती घेऊन भाजपा कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आरोप खोडून काढावेत व जनतेला संभ्रमित करण्याचे विरोधकांचे प्रयत्न खोडून काढावेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भाजपाला देशामध्ये आणि राज्यामध्ये सर्वाधिक यश मिळाले आहे. विरोधकांच्या प्रचाराला जनतेने दाद दिलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी आता लोकांना संभ्रमात टाकायचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ते खोटेनाटे आरोप करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचलित न होता विकासाच्या अजेंड्यावर ठाम रहावे.त्यांनी सांगितले की, राज्यातील ९१ हजार बूथपैकी बहुतेक बूथमध्ये भाजपाची संघटनात्मक यंत्रणा निर्माण झाली आहे. बूथ रचनेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधून संघटनात्मक बळाच्या जोरावर भाजपा विजयी होईल. २०१९ च्या आगामी निवडणुकीत भाजपा २०१४ पेक्षा जास्त यश मिळवेल.

भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री वी. सतीशजी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत जनसामान्यांसाठी राबविलेल्या विकास योजनांमुळे गोरगरीब वंचित घटकातील मतदार भाजपाला पाठिंबा देत आहेत.त्यामुळे हे मतदार म्हणजे आपली वोटबँक समजणाऱ्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना अस्वस्थ वाटत आहे. विरोधकांनी समाजात वैर निर्माण करण्याचा व विकासाचा अजेंडा हटविण्याचा प्रयत्न चालू केला आहे. याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा.पहिल्या सत्रात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजकीय ठराव मांडला. भाजपाच्या राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण होत असून विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे या ठरावात अभिनंदन करण्यात आले. या ठरावाला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव  सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला.

Previous article….तर राजकुमार बडोलेंना सांस्कृतिक कार्य मंत्रीही केले असते
Next article“ना खाऊंगा ना खाने दूंगा” म्हणत मोदींनी भरपूर खाल्ले