….तर दोषींवर कडक कारवाई करू : पंकजा मुंडे

….तर दोषींवर कडक कारवाई करू : पंकजा मुंडे

बीड : वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना कळताच राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री  पंकजा मुंडे यांनी आज संध्याकाळी तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयात जावून विषबाधेमुळे उपचार घेत असलेल्या मुलांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. पंकजा दिसतांच उपचार घेत असलेल्या मुलांच्या चेह-यांवर क्षणभर आनंदाची छटा उमटली. दरम्यान, मुलांच्या आहाराच्या बाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दुपारी भोजनातून विषबाधा झाल्यानंतर सर्वांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा प्रकार समजताच पालकमंत्री  पंकजा मुंडे तातडीने मुंबईहून बीडकडे धाव घेतली. शहरात येताच त्यांनी थेट जिल्हा रूग्णालयात जावून उपचार घेत असलेल्या मुलांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईक पणे चौकशी केली. प्रत्येक मुलांच्या जवळ जात त्यांनी केलेल्या चौकशीमुळे मुलेही स्वतःच्या वेदना क्षणभर विसरले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात यांनी यावेळी त्यांना मुलांवर करण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती दिली.

..तर कंत्राटदारांवरही कारवाई

विषबाधा प्रकरणाची  पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुलांना दिलेल्या आहाराचे नमुने अन्न व औषध प्रशासनाला पाठविण्यात आले आहेत, त्याचा अहवाल आल्यानंतर यात जे दोषी आढळतील त्यांचेवर तसेच दोषी आढळल्यास कंत्राटदारांवरही कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. मुलांच्या बाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्या म्हणाल्या. रूग्णालयात उपचार घेणा-या सर्व मुलांची तब्येत आता चांगली असून त्यांच्या पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही असे त्या म्हणाल्या.

Previous articleसंपूर्ण शालेय पोषण आहाराचीच चौकशी करा : धनंजय मुंडे
Next articleराज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार राम लक्ष्मण यांना घोषित