दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या ११९४ घरांची लॉटरी

दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या ११९४ घरांची लॉटरी

उदय सामंत

मुंबई : येत्या दिवाळीपूर्वी मुंबई मध्ये एकूण १ हजार १९४ घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव येथे लवकरच ५ हजार घरांचा पहाडी प्रकल्प  राबविण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आ. उदय सामंत यांनी म्हाडाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र  म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मुंबईत घरांच्या प्रतिक्षेत असणा-यांना दिलासा देणारी घोषणा केली. येत्या दिवाळीपूर्वी मुंबईतील विविध ठिकाणच्या आणि सर्वसामान्यांना परवडतील अशा १ हजार १९४ घरांसाठी लॉटरी काढणार असल्याची माहिती दिली. त्या शिवाय १०७ व्यापारी गाळ्यांसाठीही लॉटरी काढण्यात येणार असल्याचे  सामंत यांनी सांगितले. मुंबईत विविध ठिकाणी असणा-या प्रकल्पात संबंधित विकासकाने संबंधित व्यक्तींना घरे देण्यास टाळाटाळ केली आहे अशांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देतानाच पत्राचाळ संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून, येथिल विकासकाने जनतेला डावलले असल्याने न्यायलयात जाणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगून, यापुढे मुंबईत पत्राचाळीचा पुनर्रावृत्ती होवू देणार नाही अशी ग्वाही दिली.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोकणात घरे  म्हाडाकडून घरे देण्यात यश आले नाही मात्र लवकरच रत्नागिरीत २ हजार ५०० घरे बांधण्याचे नियोजन केले असून, यामध्ये शासकिय कर्मचा-यांसाठी घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.त्याचबरोबर रायगड, पेण, अलिबाग येथेही या योजनेअंतर्गत घरे बांधण्याचे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची म्हाडाची असणारी इमारत कमकुवत झाल्याने लवकरच नविन इमारत उभारणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. सुमारे ८५ कोटी खर्चून उभारण्यात येणा-या इमारतीत व्यावयायिक गाळे देखिल बांधण्याच येणार असल्याची माहिती आ. सामंत यांनी दिली.

 

Previous articleराज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार राम लक्ष्मण यांना घोषित
Next articleराफेल प्रकरणी शरद पवारांनी नरेंद्र मोदींना क्लीनचीट दिलेली नाही