मुंडे साहेबाची लेक आहे , शेतकऱ्याचा एकही पैसा बुडणार नाही
परळी : स्वतःच्या जमिनी विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे काम फक्त मुंडेच करू शकतात, मी मुंडे साहेबाची लेक आहे आहे, शेतकऱ्याचा एकही पैसा बुडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. तुम्ही आजपर्यंत मला खुप प्रेम दिले, आशीर्वाद दिले, संयम दाखवला मी तुमचे मनापासुन अभिनंदन करते असाच विश्वास व आशीर्वाद कायम ठेवा कारखान्याचे वैभव कमी होऊ देणार नाही असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी सांगताच उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. दरम्यान, शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास आणावा असे आवाहन त्यांनी केले.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली.
उपस्थित सभासदांसमोर पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर आलेल्या अनेक अडचणींवर मात करून कारखाना पुन्हा उभा केला आहे. एकट्या साखरेच्या पैशातून शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे देणे अशक्य आहे, त्यासाठी डिस्टिलरी, इथेनाॅल सारख्या संलग्न प्रकल्पाच्या उत्पादनांवर भर देण्यात येणार आहे.गेल्या काही वर्षांत दुष्काळ, कारखान्यात झालेला अपघात, साखरेला नसणारा भाव यामुळे कारखान्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. पण याचा फटका शेतकऱ्यांना बसू द्यायचा नाही हा निश्चय मी साहेबांनंतर त्यांच्या खुर्चीवर ज्या दिवशी बसले त्याच दिवशी केला होता. त्यामुळे आज आम्ही वैयक्तीक मालमत्ता गहाण ठेवून त्या कर्जातून शेतकऱ्यांना एफ.आर.पी. वाटप करत आहोत. आगामी काळात इथेनॉल प्रकल्प जादा क्षमतेने सुरू करण्यासाठी यंत्र सामुग्री बसविण्यात येणार असल्याने त्या उत्पादनातून येणाऱ्या काळात उसबिल देण्यात कसलीच अडचण येणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी साखरेचे दर स्वतंत्र असावेत अशी भूमिका मांडताना पंकजा मुंडे यांनी याकरिता पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्याकडे अशा मागणीचा एक प्रस्ताव मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच पंतप्रधानांकडे या प्रस्तावाचे सादरीकरण आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊस उत्पादकांना एफआरपीचे पैसे खात्यात वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगून पंकजा मुंडे यांच्या हस्ते यावेळी कांही शेतक-यांना पावत्या देण्यात आल्या. येत्या दोन तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल असे त्या म्हणाल्या. एफआरपी ची रक्कमेची घोषणा करताच उपस्थित सभासद शेतक-यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले तसेच पंकजा मुंडे यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. साहेबांच्या जाण्यानंतर निसर्गही आपल्यावर रुसला आहे की काय असे वाटत आहे परंतु प्रभू वैद्यनाथ व साहेबांच्या चरणी मी प्रार्थना केली आहे की परतीचा पाऊस दणदणीत पडून यंदा ऊस उत्पादकांना दिलासा मिळू दे असे त्या म्हणाल्या.
सभेच्या सुरवातीला कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी प्रास्ताविक केले तर कार्यकारी संचालक दीक्षितुलू यांनी अहवाल वाचन केले. सभेचे संचलन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले तर दिनकरराव मुंडे गुरूजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, विकासराव डूबे, दत्ताप्पा ईटके, रमेश कराड, प्रकाश जोशी, पंडितराव मुठाळ, जीवराज ढाकणे, सुखदेवराव मुंडे, जुगलकिशोर लोहिया, गौतमबापू नागरगोजे, श्रीहरी मुंडे, माधवराव मुंडे, किशनराव शिनगारे, ज्ञानोबा मुंडे, भाऊसाहेब घोडके, पांडुरंगराव फड, शिवाजीराव गुट्टे, दत्तात्रय देशमुख, त्रिंबकराव तांबडे, अश्रूबा काळे, परमेश्वरराव फड, गणपतराव बनसोडे, केशवराव माळी, प्रतापराव आपेट, व्यकंटराव कराड, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.