छगन भुजबळ हे राजकारणातील बाहुबली- धनंजय मुंडे
बीड : बाहुबली या गाजलेल्या हिंदी चित्रपटा ज्या प्रमाणे अत्याचारी भल्लाळदेव याची सत्ता होती, जनतेच्या मनावर राज्य मात्र बाहुबलीचे होते. त्याचप्रमाणे श्री.छगन भुजबळ साहेब हे राजकारणातील बाहुबली असून, राज्य आणि केंद्रातील अत्याचारी भल्लाळदेवची सत्ता आता आपल्याला उलथवून टाकायची आहे. असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
बीड येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आयोजित समता परिषदेच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून मुंडे बोलत होते.
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा विचार दिला, खा. शरद पवारांनी हेच कार्य पुढे नेण्याचे कार्य केले. आता भुजबळांच्या समर्थ नेतृत्वाखाली समता परिषदेच्या माध्यमातून हे कार्य जोमाने सुरू आहे. या सामाजिक क्षमतेच्या परिवर्तनाच्या लढाईत माझ्यासारखे असंख्य कार्यकर्त त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढतील असे मुंडे म्हणाले.
केंद्र आणि राज्यात परिवर्तनाचा संकल्प करण्यासाठी सोमवारी बीड येथे खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार्या विजयी संकल्प सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही मुंडे यांनी केले.
महाराष्ट्राचा बाहुबली आता बाहेर आला आहे. भल्लालदेव पुन्हा सत्तेत दिसणार नाही आणि जर केंद्रात पुन्हा भल्लालदेव ( भाजप ) सत्तेत आले तर या देशात २०१९ ची निवडणूक शेवटची ठरेल. मतदान करण्याचा पुन्हा तुम्हा आम्हाला अधिकार राहणार नाही अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली.