हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय

हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय

सर्वच्या सर्व जागा जिंकत शिवसेनेच्या पॅनलला धोबीपछाड

मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट को ऑप हाऊसिंग फेडरेशनच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह शिवाजीराव नलवडे,आ. प्रसाद लाड,सिद्धार्थ कांबळे,नंदकुमार काटकर, वसंतराव शिंदे,आदींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत स्व.रघुवीर सामंत पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकत शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा पॅनेलचा दारुण पराभव केला आहे. शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनलला या निवडणूकीत साधे खातेही उघडता आले नाही. हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

दि. मुंबई डिस्ट्रिक्ट को. ऑप. हौसिंग फेडरेशन लि.च्या निवडणूकीसाठी काल रविवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात मतदान पार पडले. त्यानंतर रात्री उशीरा या निवडणूकीची मतमोजणी पार पडली. ही निवडणूक भाजप पुरस्कृत स्व. रघुवीर सामंत पॅनल आणि शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा या पॅनल मध्ये लढली गेली. भाजपा पुरस्कृत स्व. रघुवीर सामंत पॅनलने या निवडणूकीत २१ पैकी २१ जागा जिंकत शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनलला धोबीपछाड दिला आहे. त्यांना या निवडणूकीत साधे खातेही उघडता आले नाही. भाजप पुरस्कृत स्व.रघुवीर सामंत सहकार पॅनलचे सर्वसाधारण मतदार संघातून प्रकाश दरेकर ,अजय बागल, हेमंत दळवी,यशवंत किल्लेदार,विजय शेलार,व्यंकटेश सामंत,दत्तात्रय वडेर,धनंजय बडे,काशिनाथ नाईक,विजय पवार,सुहास भोईटे,वसंत शिंदे,प्रकाश गंगाधरे,संतान कारवाल्हो,सविता झेंडे,आशिष गोयल, इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघातून ज्ञानेश्वर महाजन, अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातून तानाजी एटम, भटक्या विमुक्त जाती / जमाती राखीव मतदार संघातून ज्ञानेश्वर गोसावी, महिला राखीव मतदार संघातून छाया नेरूरकर आजगांवकर आणि सारीका सावळ या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारी गृहनिर्माण सहकारी संस्थांची प्रतिनिधित्व करणा-या फेडरेशनची ही निवडणूक होती.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी सर्व मतदारांना स्वत:च्या सहीचे पत्र पाठवून शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. शिवसेनेचे मंत्री,खासदार, आमदार, नगरसेवक आणि शाखाप्रमुख यांनी या निवडणूकीत झोकून दिले होते. एवढेच नव्हे तर मतदान केंद्रावर मतदार आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. अशा परिस्थितीत भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या समवेत शिवाजीराव नलवडे,आ. प्रसाद लाड सिद्धार्थ कांबळे,नंदकुमार काटकर,वसंतराव शिंदे यांनी स्व. रघुवीर सामंत पॅनलचे नेतृत्व करीत ही निवडणूक एक हाती लढवून सर्वच्या सर्व २१ उमेदवारांना निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. यावर प्रतिक्रिया देताना आ. दरेकर म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाचे करीत असलेला कारभार , गृहनिर्माण सहकारी संस्थासाठी त्यांनी घेतलेली भूमिका याचा परिणाम मतदारांवर झाला आहे. त्यांच्या आशिर्वादाने सर्वांना बरोबर घेवून, पक्षीय राजकारण न करता सहकार क्षेत्रात कार्य करणा-या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेवून आम्ही निवडणूक जिंकली. हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा असून, मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरून त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे आ. दरेकर यांनी सांगितले.

सर्वाधिक मते प्रकाश दरेकरांना

या निवडणूकीत सर्वसाधारण मतदार संघातून निवडणूक लढविणारे स्व.रघुवीर सामंत सहकार पॅनलचे उमेदवार प्रकाश दरेकर यांना या निवडणूकीत सर्वाधिक १ हजार ६५८ मते मिळाली.या निवडणूकीच्या रिंगणात भाजप आणि शिवसेनेचे मातब्बर उमेदवार उतरले होते. मात्र यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या मध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार आमदार सुनिल राऊत, शिवसेना नगरसेवक संजय घाडी, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, प्रशांत कदम कमलाकर नाईक यांचा समावेश आहे.

Previous articleदिव्यांगांना उपकार नको संधी हवी : डॉ. प्रकाश आमटे 
Next article…..आणि शरद पवारांनी हजारो कार्यकर्त्यांना घेतले सावलीत !