राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही :पंकजा मुंडे 

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही :पंकजा मुंडे 

मला विरोध करण्यासाठी देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये आणले

चौंडी :  मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले आहे परंतू असे कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही. इतकी वर्षे सत्ता असून सुध्दा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही? असा सवाल करून या जिल्हयाचा विकास करण्यासाठी आता इथल्या जनतेला बारामतीच्या नेत्याची गरज नाही, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे सांगून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत स्वतःचा उमेदवार पाडण्यासाठीच उमेदवार शोधत असल्याची खरमरीत टीका आज येथे केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांच्या चौंडी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम  पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार डाॅ प्रितम मुंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, माजी आमदार केशवराव आंधळे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदींसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

एखाद्या जिल्हयाच्या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी देश पातळीवरच्या नेत्याला मुक्कामाला बोलावणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याचे दुर्दैव आहे. यामागे मला विरोध करणे हाच एकमेव उद्देश आहे असे  पंकजा मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या. आम्ही राष्ट्रीय नेत्याला न बोलावता जनतेला सोबत घेऊन राजकारण करतो. ज्या जिल्हयाच्या मातीत लोकनेते मुंडे साहेबांचा जन्म झाला त्याच मातीत ते विलीन झाले, त्यांच्यावर अलोट प्रेम करणा-या इथल्या सर्व सामान्य, गोरगरीब जनतेची आम्ही समर्थपणे सेवा करत आहोत, त्यासाठी बारामतीच्या नेत्याची आम्हाला गरज नाही मग ते दहा हजार कोटीचे महामार्ग असो, रेल्वे असो की जलसंधारणाची कामे असोत, मागच्या पन्नास वर्षात कधीही झाला नाही असा विकास आम्ही चार चार वर्षात केला असल्याचे त्या म्हणाल्या.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार शोधत आहेत, स्वतःचा उमेदवार पाडण्यासाठी त्यांची ही शोध मोहिम चालू आहे. आजचा मेळावा हा त्यासाठीच आहे परंतू कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा पराभव अटळ असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Previous article…..आणि शरद पवारांनी हजारो कार्यकर्त्यांना घेतले सावलीत !
Next articleसंभाजी भिडेंना थेट भारतरत्न किंवा महाराष्ट्र भूषणच द्या! : विखे पाटील