राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा समर्थन कधीच नाही

राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा समर्थन कधीच नाही

शरद पवार

थोडेच दिवस उरले आहेत, सत्तेची मस्ती दाखवू नका-पवारांचा सरकार आणि प्रशासनाला इशारा

बीड :  ६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे ? असा सवाल उपस्थित करीत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही तर त्याची सर्वपक्षीय, संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड येथे केली. तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सत्तेची मस्ती दाखवू नका असा इशाराही त्यांनी सरकारसह बीड जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाला दिला.

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील बागलाने मैदानावर आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. बीडच्या इतिहासात प्रथमच इतकी मोठी आणि ऐतिहासिक अशी ही सभा भर उन्हात संपन्न झाली. देशाचे पंतप्रधान मन की बात सांगतात, जन की बात मात्र सांगत नाहीत. शेतकरी, अल्पसंख्यांक, तरुणांची बात मात्र एैकून घेत नाहीत अशा शब्दांत मोदींच्या मन की बातची त्यांनी खिल्ली उडविली. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाचे काय झाले ? असा प्रश्‍न विचारतानाच या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही अशा शब्दांत टोला लगावताना या सरकारला हबाडा दाखविल्याशिवाय आता गत्यंतर नसल्याचे ते म्हणाले.

आज सत्तेचा गैरवापर चालू आहे, संचालक नसतानाही आणि कर्जावर सही नसतानाही धनंजय मुंडेंना जगमित्र सुतगिरणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तडीपार केले जात आहेत. सत्तेचा हा गैरवापर करू नका, तुमचे थोडेच दिवस उरले आहेत असा इशारा त्यांनी सरकार आणि बीडच्या जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांनाही दिला. आज शेतकर्‍यांची अवस्था वाईट असल्याचे सांगताना त्यांना आधार देण्यासाठी आपण सरसकट कर्जमाफी केली होती, सध्याच्या सरकारला मात्र नीट कर्जमाफीही करता आली नाही. शेतकर्‍यांना आधार द्यायचा असेल तर संपूर्ण कर्जमाफी द्या अशी मागणी पवार  यांनी केली.
राफेल प्रकरणी पुरावा नाही म्हणून मी कोणाचे नाव घेणार नाही मात्र राफेलची खरी किंमत देशाला समजली पाहिजे, बोफोर्सच्या प्रकरणात आरोप झाले तेंव्हा राजीव गांधी त्याला सामोरे गेले. आजच्या सरकारला चौकशीची भिती का वाटते ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.जयदत्त क्षीरसागर, माजीमंत्री प्रकाश सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ.विक्रम काळे, आ.सतिष चव्हाण, माजी आ.राजेंद्र जगताप, आ.रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक नेते संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, अक्षय मुंदडा, अजय मुंडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleसंभाजी भिडेंना थेट भारतरत्न किंवा महाराष्ट्र भूषणच द्या! : विखे पाटील 
Next articleऊसतोड कामगार महामंडळ कुठे आहे, दुर्बिन लावून शोध घेतोय : मुंडे