सवर्णांना २५ टक्के आरक्षण देण्याची रामदास आठवलेंची मागणी

सवर्णांना २५ टक्के आरक्षण देण्याची रामदास आठवलेंची मागणी

मुंबई :  सवर्णांना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सरकार कोणाचेही असो दलितांवर होणारे अत्याचार थांबलेले नाही असे सांगतानाच कोणत्याही राजकीय पक्षांनी दलित अत्याचाराचे भांडवल करू नये असे आवाहन आज केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आरक्षण हा दलितांवर अत्यचार होण्याचा महत्वाचा मुद्दा असल्याने सवर्णांना २५ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आपण आगामी अधिवेशनापूर्वी होणा-या घटक पक्षांच्या बैठकीत करणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कायद्याला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.दलित पॅथर मध्ये काम करीत असताना मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी सर्वांत अगोदर मागणी मी केली होती असेही आठवले यांनी सांगितले.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या रद्द अथवा या कायद्यात कोणताही बदल होणार नसल्याचे आठवले यांनी सांगितले. दलितांवरील अत्याचार थांबले तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची गरजच उरणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.गेली १५ वर्षे रखडलेला चैत्यभूमीचा विकास करण्यात यावा अशी मागणी आठवले यांनी करीत या विकासात कोणी आडकाठी आणू नये असे सांगितले. चैत्यभूमीच्या विकासात आंबेडकर परिवार सहकार्य करीत नसेल तर यामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा असे आठवले म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी तीनशे पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा आठवले यांनी केला.एम आय एम आणि भारिप बहुजन महासंघाची झालेल्या आघाडीचे स्वागत करीत याचा फायदा भाजपलाच होईल असे आठवले यांनी सांगितले. दलितांच्या फायद्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भाजपला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. इंदु मिल मधिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी होत असेल तर पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी केली.

Previous articleजनतेचा भाजपावरचा विश्वास उडाला;निवडणुकीत परिणाम भोगावे लागणार
Next articleराज्यात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त