लोकसभेसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक सुरू
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुरू झाली असून, या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. सुमारे ९ तास चालणा-या या बैठकीत आज एकूण १८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
आज मुंबईच्या बेलार्ड ईस्टेट परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता पक्षाची महत्वपूर्ण बैठक सुरू झाली असून, या बैठकीला वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित आहेत.आज सकाळी १० वाजता सुरू झालेली बैठक सुमारे ९ तासापर्यंत सुरू राहणार आहे.या बैठकीत एकूण १८ लोकसभा मतदार संघ निहाय मॅरेथॉन बैठका घेणार आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघांतल्या ताकदीचा अंदाज या बैठकीत घेतला.
आज आणि उद्या असे दोन दिवस चालणा-या या आढावा बैठकीत एकूण २४ जिल्ह्यांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे आदी वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित आहेत.