शेतकरी, आदिवासी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे सरकारला काही देणे घेणे नाही: चव्हाण

शेतकरी, आदिवासी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे सरकारला काही देणे घेणे नाही: चव्हाण

जनसंघर्ष यात्रेला नाशिक जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद, गावोगावी उस्फूर्त स्वागत

 नाशिक : भाजप शिवसेनेचे नेते सत्ता आणि भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशामुळे मस्तवाल झाले आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच ध्येय ठरवून सरकारची वाटचाल सुरु आहे. सरकारला शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक, सर्वसामान्य गरिब जनतेच्या प्रश्नांचे काही देणे-घेणे नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या दुस-या टप्प्याच्या चौथ्या दिवसाची सुरुवात मालेगाव शहरातील विशाल सभेने झाली. त्यानंतर सटाणा व चांदवड येथे भव्य जनसंघर्ष सभा झाल्या. या सभांना मार्गदर्शन करताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की,सत्तेची हवा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेली आहे. राज्यात १६ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी शेतमाल रस्त्यावर टाकत आहेत. योग्य दर मिळत नाही म्हणून दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत तरीही सरकार शेक-यांच्या या दुरावस्थेकडे लक्ष देत नाही. कर्जमाफीची घोषणा करून दीड वर्ष उलटले पण अद्याप शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतक-यांना साले म्हणून त्यांचा अवमान करतात. भाजपचे खासदार शेतकरी आत्महत्यांची फॅशन आली आहे, असे म्हणून शेतक-यांचा अवमान करतात. अडचणीत असलेल्या शेतक-यांना मदत करण्याऐवजी भाजपचे नेते बेताल वक्तव्ये करून त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत.

राज्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. लोकांच्या हाताला काम नाही. काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आम्ही तात्काळ मदत दिली. चारा छावण्या सुरु केल्या. रोजगार हमीची कामे सुरु केली आणि शेतक-यांना कर्जमाफी दिली. आज उत्तर महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.  पण सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. अडचणीत असलेल्या शेतक-यांना मदत देण्याची या सरकारची नियत नाही. सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे.

सरकारने राज्यातील सर्वच समाजघटकांची फसवणूक केली आहे. जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. मराठा, धनगर, मुस्लीम, समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करित आहेत. अंगणवाडी सेविका, राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, कामगार, व्यापारी असे सर्वच घटक सरकार विरोधात आंदोलन करित आहेत. सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही. जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने परिवर्तनाची मशाल पेटवली आहे. नाकर्त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचून पुन्हा काँग्रेसचे सरकार आणल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबवणार नाही असे चव्हाण म्हणाले.

या सभेला मार्गदर्शन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रातले आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांच्या नाही तर ग्राहकांच्या हितासाठी काम करत आहे. देशात साखरेचे मुबलक उत्पादन झाले असताना सरकार परदेशातून साखर आयात करून साखरेचे भाव पाडत आहे. त्यामुळे राज्यातले शेतकरी आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. राज्यातल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे पण सरकार समृध्द महामार्गाच्या गप्पा मारत आहे. सरकार जनतेच्या नाही तर मोजक्या लोकांच्या हितासाठी काम करत आहे त्यामुळे हे सरकार बदलावेच लागेल.

Previous articleउमेदवार चाचपणीनंतर भविष्यकाळात योग्य निर्णय घेणार : जयंत पाटील
Next articleपुढचा मुख्यमंत्री मीच असेल : देवेंद्र फडणवीस