उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांसह भाजपा मंत्र्यांची भेट !

उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांसह भाजपा मंत्र्यांची भेट !

जनताच माझा पक्ष,निवडणूक लढवण्यावर ठाम

मुंबई : साता-याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.तर; वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्यांचे भाजपात स्वागत आहे असे वक्तव्य केल्याने आगामी लोकसभा निवडणूकीत खा.भोसले कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत साता-यातून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याऐवजी रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी एका गटाने केल्याच्या पार्श्वभूमीवर साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सुमारे अर्धा तास चर्चा केली. मुख्यमंत्री आणि खा. भोसले यांच्या भेटीत काय चर्चा झाली ते समजलेले नाही मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतर खा.भोसले यांनी भाजपच्या काही मंत्र्यांच्या गाठीभेटी घेवून चर्चा केली.तर; छ.शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागतच आहे. असे वक्तव्य राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याने आहे.खा. उदयनराजे भोसले आगामी लोकसभा निवडणूकीत वेगळा निर्णय घेतील अशी चर्चा रंगली आहे.

मंत्रालयातील गाठीभेटीनंतर खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जनताच माझा पक्ष असून, जोपर्यंत जनतेला मी निवडणूक लढवावी, असे वाटते तोपर्यंत मी निवडणूक लढवणार,अशी भूमिका त्यांनी मांडली.पक्षाने उमेदवारी देवो अथवा ना देवो, आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

खा.भोसले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत काहींनी उदयनराजे सोडून कोणीही चालेल, अशी भूमिका मांडली. फक्त आडवे करायचेच बाकी ठेवले. हा सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा भाग आहे. पूर्वी राजेशाही होती. राजे कुटुंबातील जे लोक लोकांबरोबर राहिले त्यांना जनतेने भरभरून साथ दिली. जे राजे घराण्यात जन्मले पण जनतेत मिसळले नाहीत, लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असे सांगून, मी प्रचंड मताधिक्याने निवडून आलो. ही लोकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती आहे. ज्याला कोणाला आपण प्रचंड मताधिक्याने निवडून येणार याची खात्री वाटते, त्यांनी मतांचा आकडा सांगावा. मी स्वतः त्याचा प्रचार करेल.

मी आमदार, मंत्री, खासदार, अशी सर्वच पदे भूषविली आहेत. त्यामुळे निवडणूक लढवली पाहिजेच असा माझा आग्रह नाही. पण, लोकांचा आग्रह असेल तर मी निवडणूक लढवणार, असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मतदारसंघातील विविध कामांसाठी मी मंत्रालयात अनेक मंत्र्यांची भेट घेतली असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण, जात ही संकल्पना मला कधीच पटली नाही. जातीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची. कधीतरी याचा विचार करावाच लागेल, असेही ते म्हणाले.

Previous articleउदयनराजे भोसलेंनी आरपीआयकडून लोकसभा लढवावी 
Next articleसरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत संविधान बचाव आंदोलन थांबणार नाही – अजित पवार