भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचे उद्या परळीत प्रशिक्षण शिबीर

भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचे उद्या परळीत प्रशिक्षण शिबीर

पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे राहणार उपस्थित

परळी : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानातंर्गत उद्या सोमवारी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डाॅ. प्रितम मुंडे तसेच विभाग संघटनमंत्री व भाजपचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.

एन. एच. अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्या सोमवारी सकाळी १० वा. होणा-या या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे तसेच भाजपाचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हयाचे प्रभारी गोविंदराव केंद्रे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, प्रशिक्षण अभियानाचे मराठवाडा प्रमुख राम कुलकर्णी, जिल्ह्याचे प्रमुख देविदास नागरगोजे, विधानसभा विस्तारक सुभाष धस आदींच्या उपस्थितीत होणार आहे.

सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणा-या या प्रशिक्षण शिबीरात एकूण पांच सत्र होणार असून बुथ कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य सरकारची उपलब्धी, बुथ रचना व निवडणूक व्यवस्थापन, भाजपाचा इतिहास व जडणघडण, सध्याची राजकीय परिस्थिती आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बुथ समित्यांचा आढावा देखील यावेळी घेतला जाणार आहे. शिबीरात भाजपाचे सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आदींनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

Previous articleराष्ट्रवादीचा सरकारविरोधात १५ ते २० ऑक्टोबरला राज्यभर एल्गार
Next articleगिते स्व. बाळासाहेबांचा नाही तर मोंदीचा जप करुन निवडून आलेत