धनंजय मुंडेंनी वाचवले दोन अपघातग्रस्तांचे प्राण

धनंजय मुंडेंनी वाचवले दोन अपघातग्रस्तांचे प्राण

बीड : विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे आज दोन अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकिय मदत मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी की, धनंजय मुंडे हे आज बीड येथील धनगर समाज आयोजित गुणवंत सत्कार सोहळा आटोपून परळीकडे येत असताना सायंकाळच्या सुमारास बीड- परळी रस्त्यावर घाटसावळी जवळ असलेल्या बकुरवाडी जवळ एका मोटार सायकलस्वाराचा गंभीर अपघात झाल्याचे त्यांना दिसले. अज्ञात फॉर्च्युनर वाहनाने त्यांना जोराची धडक देऊन पळ काढला होता. यातील एकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने रस्त्यात रक्तच रक्त पडले होते तर दुसरा मोटारसायकल स्वार रस्त्याच्या कडेला दूर फेकला गेला होता त्यास पायाला जबर मुका मार लागल्याने त्यास उठता ही येणे शक्य नव्हते.

अपघाताचे दृश्य दिसताच मुंडे यांनी आपली गाडी थांबवून त्या दोन्ही जखमींना स्वतः व सोबतचे सहकारी व इतरांच्या मदतीने उचलून आपल्या ताफ्यातील पोलीस बंदोबस्ताच्या गाडीतून तातडीने बीडकडे रवाना केले.बीडच्या जिल्हा रुग्णालयात सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात यांना फोनवर सूचना देऊन तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, पिंपळनेर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीसांना स्वतः फोन करून तातडीने नाकाबंदी करून त्या वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या.

विक्रम लिंबाजी कांबीलकर वय ३५ वर्ष व शंकर नारायण जाधव वय ४५ वर्षें माणकुर ता जि बीड अशी या जखमींची नावे असून त्यांना विशेष सुरक्षा पथकाचे पदमसिंह काळूसिंग सिंगल, समाधान लक्ष्मण लोखंडे, चालक संतोष हारके, पोलीस कॉन्स्टेबल एस एल कोरडे, यू.ए. बुंदीले यांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले. धनंजय मुंडे यांचे सोबत असलेले स्वीय सहाययक प्रशांत जोशी, सुरक्षा रक्षक सोपान चाटे, चालक संतोष जाधव यांनीही घटनास्थळी मदत कार्यात भाग घेतला.या दोघांवरही बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू असून ते धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ थोरात यांनी सांगितले.

घटनास्थळी या जखमींना मदत करण्याची एककिडे गडबड सुरू असतांना काही उत्साही तरुण मोबाइल वर त्याचे शूटिंग व फोटो घेत होते, हे दिसताच मुंडे यांनी त्यांना अरे लाज वाटत नाही का ? फोटो काय काढता ? जखमीना उचलू लागा, ती अपघातग्रस्त गाडी आधी रस्त्यातून बाहेर काढा असे सुनावले. यापूर्वीही एकदा हल्लाबोल यात्रेला तुळजापूरला जात असताना सायंकाळच्या वेळी कळंब जवळ झालेल्या अपघात ग्रस्तांना मुंडे यांनी अशीच मदत केल्याने त्यांचे प्राण वाचले होते.

Previous articleराज्यात ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी नाही : बावनकुळे
Next articleपंकजा मुंडे यांच्या झुंजार नेतृत्वाची परराज्यातील जनतेलाही भुरळ