…तर जनताच मशाली घेऊन विद्युत मंडळाच्या कार्यालयात घुसेल: मुंडे

…तर जनताच मशाली घेऊन विद्युत मंडळाच्या कार्यालयात घुसेल: मुंडे

परळी : ऐन सणासुदीच्या दिवसात अघोषित लोडशेडींग करणार्‍या एम.एस.ई.बी. च्या विरोधात आज परळीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने एम.एस.ई.बी. कार्यालयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कंदील मोर्चा काढण्यात आला. आज आम्ही कंदील मोर्चा काढला आहे, उद्या लोडशेडींग बंद न झाल्यास राज्याची जनता मशाली घेऊन एम.एस.ई.बी. च्या कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला.

राज्यातील लोडशेडींगच्या विरूध्द आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात विद्युत मंडळाच्या कार्यालयावर कंदील मोर्चे काढण्यात आले. परळीत झालेल्या या आंदोलनाचे धनंजय मुंडे यांनी नेतृत्व केले.गणेशपार येथून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो कार्यकर्ते कंदील आणि मशाली घेऊन एम.एस.ई.बी. च्या विरोधात घोषणाबाजी करत विद्युत मंडळाच्या कार्यालयावर धडकले. या ठिकाणी अधिकार्‍यांना धनंजय मुंडे यांनी कंदील भेट देऊन महागाईचा निषेध नोंदवला.

यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, संपुर्ण राज्याला विज देणारे परळी शहर आज अंधारात आहे, निवडणुका असलेल्या राज्यात कोळसा देऊन भाजपा सरकार महाराष्ट्र अंधारात ठेवत आहे. उपमुख्यमंत्री असताना अजित दादा पवार यांनी विज निर्मिती करणार्‍या परळी शहराला लोडशेडींग मुक्त करून दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

फडणवीस सरकारने राज्य लोडशेडींग मुक्त करू, टँकर मुक्त करू अशा घोषणा केल्या होत्या. मात्र जनतेची फसवणूक करून राज्याला अंधारात ढकलले आहे. ग्रामीण भागात १८-१८ तास लोडशेडींग करून जनतेचे हाल केले जात आहेत. दुष्काळाने अधिच त्रस्त झालेला शेतकरी लोडशेडींगच्याही जाचाला वैतागला आहे, सामान्य जनता भारनियमनाचे चटके सहन करत असून, ऐन दसरा-दिवाळीच्या सणात महाराष्ट्र अंधारात लोटला आहे. ऊर्जा विभाग नव्या ४ योजनांचा शुभारंभ करीत आहे, त्यापेक्षा त्यांनी लोडशेडींग मुक्त करण्याची योजना आणावी असा टोला लगावला.

स्थानिक नेतृत्व सत्तेत असूनही परळी सारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणीही साधे दिवे लावता येत नाहीत. आज शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मरसाठी ऑईलही मिळत नाही. भारनियमन बंद करा नाहीतर ही जनता मशाली घेऊन तुमच्या कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला.

Previous articleशिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार २ लाख ५० हजार घरकुलांचे ई-गृहप्रवेश
Next articleआता रद्दीच्या मोबदल्यात मिळणार नव्या-कोऱ्या वह्या