आता रद्दीच्या मोबदल्यात मिळणार नव्या-कोऱ्या वह्या

आता रद्दीच्या मोबदल्यात मिळणार नव्या-कोऱ्या वह्या

मुंबई :  शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता या मुलांना रद्दीच्या मोबदल्यात नव्या कोऱ्या वहया मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि नमोआनंद अपसायकलर्स यांच्यात सामंजस्य करार नुकताच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला असून या सामंजस्य करारानुसार विदयार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या वह्या मिळणार आहेत.

ʻरद्दीच्या मोबदल्यास नव्या कोऱ्या वह्या ʼ ही योजना राज्यातील सर्व शाळा (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय अनुदानित शाळा, निमशासकीय शिक्षण संस्थांमध्ये राबविली जाणार आहे. राज्याचा शालेय शिक्षण विभाग व ‘नमोआनंद अपसायकलर्स’ या स्टार्टअप कंपनीसोबत शासनाचा सामंजस्य करार असून शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. वंदना कृष्णा आणि नमोआनंद कंपनीचे संचालक आनंद जितेंद्र कोठारी व जितेंद्र स्वरूपचंद कोठारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

राज्यभरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आता आपल्याकडील रद्दी या कंपनीकडे घेऊन आल्यानंतर या विद्यार्थ्यांना या रद्दीच्या मोबदल्यात नव्या कोऱ्या ‘ग्रीन नोटबुक’ व अन्य पेपर स्टेशनरी मिळणार आहे. दीड वर्षांपूर्वी ही योजना पुण्यातील महापालिका शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती आणि त्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या वह्या १०० टक्के पर्यावरणपूरक असून त्या पुनर्निर्मित कागदापासून  पासून बनविलेल्या आहेत.

राज्यातील सर्व शाळांनी ही योजना ऐच्छिक स्वरूपात राबवायची असून त्यासाठी आपल्या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जमा होणारी रद्दी शाळेतील कलेक्शन सेंटरमध्ये जमा होणार आहे. रद्दी कागदांपासून पुनर्निमिर्ती करुन वह्या तयार केल्याने या नव्या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतानाच कागद आयातीसाठीचे परकीय चलन वाचणार आहे. सध्या आपल्याकडे शालेय वह्या-पुस्तकांची रद्दी जमा करण्याची संघटित यंत्रणा अस्तित्वात नाही. अशी रद्दी या माध्यमातून एकत्र होऊन तिचा सदुपयोग विद्यार्थ्यांसाठीच होणार आहे.वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे पहिली कुऱ्हाड झाडांवर चालवली जाते. कागदाचा वापर वाढत असल्याने वृक्षतोड देखील अपरिहार्य बनली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे आपल्या वातावरणातील कार्बन-डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढत असून ही बाब चिंताजनक आहे. या योजनेत ‘नमोआनंद’ कंपनीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका पातळीवरील  शाळांमध्ये रद्दी जमा करण्यासाठी अधिकृत ‘आनंद कलेक्शन सेंटर’ची उभारणी करण्यात येणार असून त्या ठिकाणी स्वेच्छेने रद्दी जमा करता येईल. रद्दीमध्ये वह्या, पुस्तके, प्रश्नपत्रिका किंवा अन्य वापरेल्या किंवा न वापरलेली पुस्तके आणि कागद किंवा अन्य रद्दीचा समावेश असेल.योजनेची अधिक माहिती व तपशील जाणून घेण्यासाठी 78 47 00 55 55 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Previous article…तर जनताच मशाली घेऊन विद्युत मंडळाच्या कार्यालयात घुसेल: मुंडे
Next articleधारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा