वाह रे मोदी तेरा खेल :राष्ट्रवादीचा राज्यभर एल्गार

वाह रे मोदी तेरा खेल :राष्ट्रवादीचा राज्यभर एल्गार

मुंबई : वाह रे मोदी तेरा खेल…घरपोच दारु महेंगा तेल…मोदी सरकार हाय हाय… सरकार हमसे डरती है…पुलिस को आगे करती है… महागाई रद्द झालीच पाहिजे…लोडशेडिंग रद्द झालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई राष्ट्रवादीच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आणलेले ‘गाजर’ चक्क भाजप कार्यालयाकडे भिरकावले आणि सरकारविरोधातील तीव्र संताप व्यक्त केला. आमदार विदयाताई चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांचे सरकारविरोधातील आक्रमक रुप लक्षात घेता पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले तर दुसरीकडे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी दुसरी बाजू लावून धरत भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आज पक्षाने अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. शेवटी आंदोलनकर्त्या राष्ट्रवादीच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली आणि पोलिस व्हॅनमध्ये टाकून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, वीजेचे लोडशेडिंग पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार राज्यभर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात निषेध मोर्चे सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तर आज मुंबई राष्ट्रवादीच्यावतीने भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

Previous articleपक्ष बांधणीसाठी राज ठाकरे विदर्भाच्या दौ-यावर
Next articleआरे…लपून वार काय करता, समोरून वार करा