…..नाही तर आम्ही राम मंदिर बांधू : उद्धव ठाकरे

…..नाही तर आम्ही राम मंदिर बांधू : उद्धव ठाकरे

मुंबई : राम मंदिर बांधायचे असेल तर त्याचे काम लगेच सुरू करा,नाही तर आम्ही राम मंदिर बांधू, येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आणि या ठिकाणी विचारले तेच प्रश्न आयोध्येत मोदींना विचारणार असल्याचे सुनावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर आज शिवतीर्थावर झालेल्या विराट दसरा मेळाव्यात निशाणा साधला.आजच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.

आज शिवतीर्थावर झालेल्या विराट दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि भाजपवर हल्लाबोल केला.आश्वासन दिल्या प्रमाणे राम मंदिर बांधा नाही तर जाहीर करा की राम मंदिर हा मुद्दाही जुमला होता. त्यांच्याकडून जर राम मंदिर उभारणीला सुरुवात झाली नाही तर आम्ही ते बांधू,अशा शब्दांमध्ये त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला. येत्या २५ नोव्हेंबरला मी अयोध्येला जाणार आणि या ठिकाणी विचारले तेच प्रश्न आयोध्येत मोदींना विचारणार असेही त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले.या भेटीत अयोध्या राम मंदिराबाबत दिलेल्या आश्वासनांची आठवण तुम्हाला करून देवू, पण त्यानंतरही काही झाले नाही तर तमाम हिंदूंना घेऊन अयोध्येत येईन आणि राम मंदिर उभारणीस सुरूवात करू असा इशारा देत आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला.आम्ही तुमचे दुश्मन नाही परंतु जनतेच्या भावनांशी खेळू नका त्यांच्या आशेवर पाणी सोडाल तर त्याचा लाव्हा होवून तुमचा भस्म व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

पंतप्रधानांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी सवाल केला की,आपल्या देशाचा पंतप्रधान एकादाही अयोध्येत का गेला नाही. आपले पंतप्रधान जगभर फिरतात. त्यामुळे भूगोलात कधी पाहिले नाही ते देशही आपल्याला कळले, जगभर फिरणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकदाही अयोध्येत का गेले नाहीत, बाजूच्या मतदारसंघातून निवडून येवूनही ते अयोध्येत कधी गेले नाहीत. राम मंदिर बांधायला छाती किती आहे ते नाही तर; मनगटात बळ किती आहे ते महत्त्वाचे आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यास देशद्रोहाचा ठपका ठेवला जात आहे. सोसायटीच्या निवडणूकीसाठी मुख्यमंत्र्यांचे फोन जातात असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना अजूनही दुष्काळ जाहीर केलेला नाही. मात्र कर्नाटकने दुष्काळ जाहीर केला असल्याचे सांगत, लवकरात लवकर दुष्काळ जाहीर न झाल्यास शिवसेना स्वतःच्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले.

Previous articleआरे…लपून वार काय करता, समोरून वार करा
Next articleहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी कोणालाही फोन केले नाही