कर्जमाफीत भ्रष्टाचार झाला तर तुमचे मंत्री काय करत होते : अजित पवार
पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीच्या भाषणात कर्जमाफी मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला होता. याचा खरपूस समाचार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतला आहे.जर कर्जमाफीत भ्रष्टाचार झाला तर तुमचे मंत्री काय करत होते. त्यांनी तो उघडकीस का आणला नाही असा सवाल त्यांनी केला आहे. महागाईला भाजप बरोबर शिवसेनाही जबाबदार आहे. या सरकारच्या सगळ्या अपयशांमध्ये शिवसेनाही तेवढीच वाटेकरी आहे. असेही पवार म्हणाले.
शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका असून, राज्यात सत्तेत असताना एवढ्या वर्षात शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारता आले नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदर बाळासाहोबांचे स्मारक बांधावे नंतरच राम मंदिर बांधावे असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला आहे. बाळासाहेबांचे स्मारक उभारल्यास लोकांना खात्री पटेल असे सांगून केवळ लोकांना भावनिक करण्यासाठीच शिवसेनेकडून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यात धमक असेल तर त्यांनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे आव्हानही पवार यांनी दिले.विविध मागण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने पुण्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.राम मंदिराचा मुद्दा केवळ आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून उपस्थित केला जात असून, भाजपा शिवसेना गेल्या चार वर्षापासून सत्तेत असताना त्यांना मंदिर बांधण्यापासून कोणी रोखले होते असा सवालही पवार यांनी केला.










