सुभाष देशमुखांच्या संस्थेने कोट्यावधी लाटल्याचा संजय निरुपमांचा आरोप

सुभाष देशमुखांच्या संस्थेने कोट्यावधी लाटल्याचा संजय निरुपमांचा आरोप

मुंबई :  राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप  मुंबई कॅांग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला असून,सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सो लि, सोलापूर या संस्थेने बनावट कागदपत्रे जोडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत दुध भुकटी प्रकल्पासाठी  २४.८१ कोटी अनुदान मंजूर करून घेतले आहेत,त्यातील ५ करोड या संस्थेला मिळालेले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीत या प्रकल्पासाठी त्यांनी जमीन एन ए ऑर्डर, प्रदूषण परवाना, बांधकामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व औषध प्रशासन परवाना, एम एस ई बी परवाना पत्रक, कलेक्टर कार्यालय, कारखाना अधिनियम परवाना, दुग्ध प्रक्रिया, दुग्ध संकलन या सर्व विभागाचे सर्व कागदपत्रे बनावट आहेत. या संबंधित संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सोलापूर यांनी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पत्राद्वारे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, पुणे यांना कळविलेली आहे. लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सो लि, सोलापूर या संस्थेचे दुध प्रक्रिया केंद्र करमाळा, सांगोला, मंगळवेढा, बीबीदारफळ येथील सद्यस्थितीत बंद असल्याचे निदर्शनास आलेले आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सो लि, सोलापूर या संस्थेवर सुभाष देशमुख अध्यक्ष असतानाच हे खोटे प्रकरण तयार करण्यात आले होते. खोटी कागदपत्रे तयार करून सरकारची फसवणूक केली गेलेली आहे. आता या संस्थेचे अध्यक्ष त्यांचा मुलगा रोहन सुभाष देशमुख आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सुभाष देशमुख आणि रोहन देशमुख यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी करून  सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, किंवा त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी निरूपम यांनी केली आहे.

 

Previous articleकर्जमाफीत भ्रष्टाचार झाला तर तुमचे मंत्री काय करत होते : अजित पवार
Next articleएक रूपयाही खर्च झाला नाही, मग भ्रष्टाचार कसा झाला ?