लवकरच १७९ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करणार
नाशिक : दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असून,एकूण १७९ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करणारा शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांगीतुंगी, नाशिक येथील कार्यक्रमात केली.
राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे तर ३१ ऑक्टोंबर पर्यंत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली जाईल असे राज्य सरकारकडून सांगितले जात असतानाच यासंदर्भात विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असतानाच आता अडचणीस सापडलेल्या राज्यातील शेतक-यांना दिलासा देणारी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथील मांगीतुंगी कार्यक्रमात केली आहे.
दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असून,१७९ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करणारा शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल. यामध्ये ९ विविध प्रकारच्या उपाययोजना जाहीर केल्या जातील. त्यात टँकर्स, वीज बिल, महसुली कर वसुलीला स्थगिती, शैक्षणिक शुल्क माफ करणे आणि इतर सर्व प्रकारची मदत अंतर्भूत असेल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.











