अंगणवाडी सेविकांना दोन हजाराची दिवाळी ‘बहीण बीज ‘ भेट
२ लाख ७ हजार सेविकांची होणार दिवाळी गोड
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गोड केली आहे. यंदा दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये ‘बहीण बीज’ (भाऊबीज) त्यांनी मंजूर केली असून लवकरच त्यांच्या बॅंक खात्यात ही भेट जमा होणार आहे. सुमारे २ लाख ७ हजार ९६१ अंगणवाडी सेविकांना ही भेट मिळणार आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका, ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस व १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण दोन लाख सात हजार ९६१ मानधनी कर्मचा-यांना सन २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी रुपये दोन हजार प्रमाणे ‘बहिण बीज’ (भाऊबीज) भेट रक्कम अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी आज या संदर्भातला अध्यादेश काढून अंगणवाडी सेविकांना दिवाळी भेट देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.
पंकजा मुंडे यांनी दिलेली दिवाळी भेटीची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या बॅक खात्यात लवकरच जमा होणार आहे. गेल्या वर्षी देखील दोन हजार रुपये ‘बहिण बीज’ त्यांनी सेविकांना दिली होती. या भेटीने आनंदित झालेल्या तमाम सेविका व मदतनीसांनी दिवाळी गोड केल्याबद्दल पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.










