मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची फसवणूक करणारी : धनंजय मुंडे
मुंबई : ‘दुष्काळ संहिता-२०१६’च्या निकषांमुळे अनेक तालुके आणि गावे मदतीपासून वंचित राहणार असल्याने जोपर्यंत ती संहिता रद्द होत नाही व पूर्वीची आणेवारी पद्धत लागू होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेली दुष्काळसदृश परिस्थिती घोषणा फसवी व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. शेतातली उभी पिके करपून गेली आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काऐवजी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ झाले पाहिजे. दुष्काळामुळे दुधउत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली पाहिजे. पशुधन वाचवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. टँकर मंजूरीचे अधिक स्थानिक स्तरावर दिले पाहिजेत. कृषीपंपांची वीजबीलांची वसूली थांबवण्याऐवजी ती माफ करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
केंद्राचं पथक आल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याची घोषणाही फसवणूक करणारी आहे. केंद्राचे पथक कधी येणार ? कधी पाहणी करणार ? त्यानंतर दुष्काळाची कधी घोषणा होणार ? याबाबत मुख्यमंत्र्यांनी निश्चित काहीच सांगितलं नाही. हा वेळकाढूपणा असून मुख्यमंत्र्यांची आश्वासने पोकळ आहेत. राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ असताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. ठोस व तात्काळ उपाययोजना लागू कराव्यात. सहनशीलतेचा अंत बघू नये. असे मुंडे यांनी म्हटले आहे.










