८०० टन प्लास्टिक जप्त; ३ कोटी दंड वसूल: रामदास कदम
मुंबई : राज्यभर प्लाटिक बंदीच्या अंमलबजावणीसाठीची मोहीम अधिक तीव्र केली असून आतापर्यंत ८०० टन प्लास्टिक जप्त करुन ३ कोटी रुपये दंड वसूल केल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.
प्लास्टिक बंदी संदर्भात मंत्रालयात शक्ती प्रदक्त समितीची बैठक आज झाली. त्यावेळी कदम बोलत होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. हा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानात मालाची विक्री करताना पॅकेजिंग मटेरियल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. असे प्लास्टिक आवरण नष्ट केले जात नाही अथवा त्याचे रिसायकलिंग केले जात नाही. त्यासाठी असे मटेरियल एकत्रपणे गोळा करुन त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी उत्पादक कंपन्यांची आहे. अशा दुकानदारांनी योग्य पद्धतीने प्लास्टिकची विल्हेवाट लावली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे कदम यांनी सांगितले.
राज्यात ज्या ज्या औद्योगिक परिसरात प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्य तयार करणारे कारखाने सुरु आहेत. त्यांच्यावरही धडक कारवाई करण्यात येत आहे. अलीकडेच चाकण परिसरात दोन कारखान्यावर धाडी टाकून शेकडो टन प्लास्टिक जप्त केले आहे. प्लास्टिक बंदीची मोहीम केवळ शहरी भागापूरती मर्यादित न राहता ती खेड्यापाड्यांपर्यंत राबविली पाहिजे. असे सांगून कदम म्हणाले जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीने यात पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे.