शरद पवार म्हणाले.. “राजला माझ्या बाजूला बसू द्या”
मुंबई : औरंगाबाद-मुंबई दरम्यानच्या विमानप्रवासातील शरद पवार आणि राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच यातील वास्तव समोर आले आहे.खुद्द शरद पवार यांनीच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना विनंती केल्याने राज ठाकरे त्यांच्या सीटवर बसले.
औरंगाबाद विमानतळाहून मुंबईकडे निघालेल्या विमानात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते त्यांच्या सीटवर बसत होते. राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या सीट्स उजवीकडे बाजूबाजूला होत्या, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सीट्स डावीकडच्या रांगेत बाजूबाजूला होत्या. विमानातील आपल्या सीटवर शरद पवार बसल्यावर त्यांच्या बाजूच्या सीटवर अर्जून खोतकर बसणार…एवढ्यात इतक्यात शरद पवार त्यांना म्हणाले, “तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या.”
पवार यांच्या या बोलण्याचा मान राखत राज्यमंत्री खोतकर उजवीकडच्या रांगेत म्हणजे बाळा नांदगावकरांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यानंतर पुढच्या साधारण तास-दीड तासाच्या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा रंगल्या. पवार आणि ठाकरे यांच्या गप्पा सुरु असताना त्यात थोड़ा वेळ का होईना पण सहभागी होण्याचा मोह राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मनसे नेता बाळा नांदगावकर यांनाही आवरला नाही. त्यासाठी सीट सोडून हे दोघे लोकल ट्रेनप्रमाणे विमानातही उभे राहिले.