दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकायच्या दृष्टीने कामाला लागा : आठवले

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकायच्या दृष्टीने कामाला लागा : आठवले

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा अवधी असला तरी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या निवडणूक प्रचारास सुरुवात केली आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे.रिपाइंच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या निवडणूक प्रचारास प्रारंभ केला आहे. भाजप शिवसेना यांची युती होवो अथवा न होवो मात्र आपल्या बळावर भाजपच्या साथीने दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यास लागावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

चेंबूर मैत्रिपार्क येथील कॅकसन हाऊस येथे रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या प्रशस्त जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ सीमाताई आठवले; कुमार जित आठवले; रिपाइं चे राष्ट्रीय प्रवक्तेअविनाश महातेकर; दिपकभाऊ निकाळजे; गौतम सोनवणे; सिद्धार्थ कासारे; अनिसभाई पठाण; मुस्लिम लिग मधून रिपाइं मध्ये आलेले इकबाल कन्नन; हसन शेख ; हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्यसभेत जीव रमत नाही सांगत रिपब्लिकन पक्षाचे लोकसभेत अस्तित्व निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्याचा आपण निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे राहुल शेवाळे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र आता या मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार असल्याने शिवसेनेने त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करावे. शिवसेना भाजप यांची युती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.सेना भाजपची युती लोकसभा निवडणुकीत निश्चित होईल असा मला विश्वास असून युती झाल्यास दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात पालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेसाठी सोडला जावा असा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवशक्ती भीमशक्ती युतीचे सवप्न मी व माझ्या रिपब्लिकन पक्षाने पूर्ण केले असल्याने शिवसेना माझ्यासाठी जरूर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यापूर्वी १९९८ मध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी लढवून रामदास आठवले विजयी झाले होते.त्यामुळे या मतदारसंघाची आपला निश्चित एक मतदारसंघ म्हणून रामदास आठवले यांनी निवड केली आहे. या मतदारसंघात त्यांनी कामाला सुरुवात केली असून आज जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. चेंबूर आणि अनुशक्तीनगर हे दोन रिपाइंचे बालेकिल्ले या मतदारसंघात असल्याने रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि उत्साह पाहायला मिळत आहे. रिपाइंच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास मुस्लिम कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला होता. मोठया प्रमाणात मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षातर्फे दलित मुस्लिम एकजुटीचे सूत्र राबविण्यात येत असल्याचे चित्र दिसत होते. एकत्र आल्याने दलित मुसलमान रिपाइंलाच मिळणार विजयाचा मान अशी चारोळी जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनपर भाषणात आठवलेंनी सादर केली.

Previous articleभुजबळांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटुन उठेल-धनंजय मुंडे
Next articleम्हाडाचे अध्यक्ष उदय सामंतांच्या प्रयत्नांमुळे रहिवाशांना मिळाले थकीत भाडे