शिवसेनेने गरळ ओकण्यापेक्षा राजीनामे देऊन ताठ कणा दाखवावा
पुणे : शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर सामना मधील अग्रलेखातून जहरी टीका केल्यानंतर या दोन पक्षांत जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादी नेते आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आमच्या उद्घवला सांभाळा, असे बाळासाहेब अखेरच्या क्षणी का म्हणाले होते, ते आज कळाले, असे रोहित पवार म्हणाले आहेत.अजित पवार यांनी राम मंदिर बांधण्याच्या उद्घव यांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला होता. त्यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. त्यानंतर या दोन पक्षांत जुंपली आहे.
रोहित पवार म्हणाले की, बाळासाहेबांना म्हणायचे होते की आमचा उद्घव अल्लड आहे. त्याला सांभाळून घ्या. बाळासाहेब भाषेवर प्रभुत्व असलेले मोठे नेते होते. त्यांची भाषा मार्मिक असायची. पण त्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून लेखणीचा अपमान केला आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे.
उद्घव ठाकरे कधीही लोकांमधून निवडून आलेले नाहीत. शेतकऱ्यांची अवस्था त्यांनी पाहिलेली नाही. खिशातले राजीनामे बाहेर काढून दिले असते तर वडलांप्रमाणे ताठ कणा तरी महाराष्ट्राला पहायला मिळाला असता, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.