मोदी सरकारचा कारभार म्हणजे आम्ही करू तीच पूर्व दिशा : शरद पवार
पुणे:सीबीआयसारख्या स्वतंत्र यंत्रणांच्या प्रमुखांना एका रात्रीत घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री घेण्यात आला. यावरुन आम्ही करू तीच पूर्व दिशा, असा मोदी सरकारचा कारभार असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार यांनी मोदी सरकार आणि भाजपाच्या धोरणावर आपल्या भाषणात टीका केली. सीबीआयसारख्या महत्वाच्या आणि स्वतंत्र यंत्रणेचे प्रमुख अलोक वर्मा यांची एका रात्रीत उचलबांगडी करण्यात आली. या प्रकारमुळे मोदी सरकारच्या कारभारावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निःपक्षपातीपणे चौकशीसाठी सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा आहे.परंतु सीबीआयच्या प्रमुखांची उचलबांगडी करण्याचा निर्णय देशातील राज्यकर्त्यांकडून मध्यरात्री घेण्यात आला. त्याची हि कृती म्हणजे आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असा या सरकारचा कारभार असून, तो देशासाठी घातक आहे’, असे पवार म्हणाले. पवार यांनी ट्विट करून सीबीआय प्रमुख अलोक वर्मां यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या धोरणावर टीका केली. तसेच ज्या व्यक्तीची चौकशी सुरू आहेत, त्यांना प्रमुख म्हणून त्यांच्या जागी नेमण्यात आले आहे असे स्पष्ट करीत आम्ही जे वागू तेच बरोबर आहे, असे ठसवण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे.