पंकजा मुंडे यांच्या अमेरिका दौ-याविषयी विरोधकांचा पोटशूळ : भाजप

पंकजा मुंडे यांच्या अमेरिका दौ-याविषयी विरोधकांचा पोटशूळ : भाजप

माध्यमांना खोटी माहिती देवून बदनाम करण्याचा कुटील डाव

मुंबई : महाराष्ट्रातील बचतगटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे हया सध्या ग्रामीण बचतगटांच्या महिलांना घेवून अमेरिकेच्या शासकीय दौ-यावर गेल्याने विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. प्रसिद्धी माध्यमांना खोटी माहिती देवून त्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव त्यांनी आखला असल्याचे भाजपने म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) मार्फत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, फिक्कीचे अतिरिक्त संचालक रुबाब सूद, बचतगट प्रतिनिधी विमल जाधव, राजश्री राडे, अनिता सोनवणे, संगिता गायकवाड यांचा समावेश आहे. हा समुह अमेरीकेतील बोस्टन, न्युयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को या शहरांना भेटी देणार आहे. महाराष्ट्रातील वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्यं असलेली वस्त्र उत्पादने, इथली खाद्यसंस्कृती, हातमाग उत्पादने आदींविषयक अमेरीकेतील नागरीकांना विशेष आकर्षण आहे. याचा उपयोग महाराष्ट्रातील बचतगटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल याविषयी या दौऱ्यात आदान – प्रदान आणि चर्चा केली जाणार आहे.

पंकजा मुंडे यांनी १६ व १७ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हयातील परळी, अंबाजोगाई, केज आणि धारूर या चार तालुक्यातील शेतक-यांच्या प्रत्यक्ष बांधावर जावून पीक परिस्थितीची पाहणी केली शिवाय त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. एवढेच नव्हे तर जिल्हाधिका-यां समवेत सर्व अधिका-यांची आढावा बैठकही घेतली. सरकारच्या अॅपवर दुष्काळाची माहिती भरून शेतक-यांना तातडीने मदत मिळण्यासाठी अधिका-यांना सूचनाही केल्या.

पंकजा मुंडे यांचा दौरा ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी व चांगल्या कामासाठी आहे. त्या सहलीसाठी किंवा मौजमजेसाठी गेल्या नाहीत. दौ-याचा उपयोग दुष्काळी भागातील महिलांना होवून त्यांना एकप्रकारे मदतच होणार आहे. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या चांगल्या कामाला खोडा घालण्याचा विरोधक प्रयत्न करत असतात. या अगोदरही त्या ज्या ज्या वेळी विदेश दौ-यावर गेल्या त्यावेळी त्यांच्या माघारी विरोधकांनी अशीच खेळी केली होती. प्रसिद्धी माध्यमांना खोटी माहिती देवून त्यांना बदनाम करण्याचा डाव जनतेच्या लक्षात आला असून त्यांचे हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत असे बीड भाजपने म्हटले आहे.

Previous articleफडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्र खड्डयात : खा. अशोक चव्हाण
Next articleतुम्हाला न्याय मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे