आगामी निवडणूकीत शिवसेनेबरोबर युती होणार : मुख्यमंत्री

आगामी निवडणूकीत शिवसेनेबरोबर युती होणार : मुख्यमंत्री

मुंबई : भाजपसोबत युती करण्यास शिवसेनेने स्पष्ट शब्दात नकार दिला असतानाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती होईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.एबीपी माझा वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

गेल्या विधानसभा निवडणूकी वेळी शिवसेनेला आम्ही १४७ जागा सोडण्याची तयारी दाखवली होती तर ; आम्ही १२७ जागा लढवणार होतो.परंतु शिवसेनेने आपला १५१ जागांचा हट्ट सोडला नाही.युती बाबत आम्ही चार दिवस चर्चा केली असे सांगतानाच २५ वर्षांपासूनची युती तुटली त्याला आम्ही जबाबदार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.गेल्या निवडणूकीत युती झाली असती तर सेनेला १२० च्या आसपास आणि आम्हाला १०५ जागा मिळाल्या असत्या. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद माझ्या नशिबी होते त्यामुळेच शिवसेनेने हा प्रस्ताव मान्य केला नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या निवडणूकीपूर्वी शिवसेना मोठा पक्ष होता. परंतु २०१४ च्या निवडणूकी नंतर भाजप मोठा पक्ष झाला. ही गोष्ट त्यांच्या अगवळणी पडण्यास वेळ लागत आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना भाजपची युती झाली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही एकत्रित निर्णय घेतो. एखाद्या मुद्यांवर मतभेद असल्यास ते संवादाने सोडवतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

Previous articleशिवसेनेकडे युतीचा आग्रह म्हणजे मित्रत्व : दानवे
Next articleबेघरांना मिळणार परवडणाऱ्या किंमतीत घरे : पंकजा मुंडे