भाजपच्या गाजराच्या पिकाला मतांचं पाणी देऊ नका: उद्घव ठाकरे
महाड: भाजप हा सत्तांध हत्ती आहे. आम्ही या हत्तीवर अंकुश मारणारच आहोत. सध्या राज्यात दुष्काळ आहे. पण थापांचं पीक जोरदार आलंय. जनतेला विचित्र वातावरणात आधार हवा आहे. गाजराच्या पिकाला मतांचं पाणी देणार का? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मावळे तयार आहेत. लढाईची सुरुवात झाली आहे. देशातील वातावरण बिघडले असल्याचे सांगून उद्घव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचाय, असेही सांगितले. महाड येथून ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा प्रारंभ झाला. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली.भाजपने खोटे बोलून मते मिळवली, असा आरोप करतानाच आम्हाला खोटं बोलून सत्ता नको, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आश्वासनं दिली तर ती पूर्ण केलीच पाहिजेत.अच्छे दिन आणू असे भाजपने आश्वासन दिले होते. सत्ता आल्यावर अच्छे दिन आलेच नाहीत. आता प्रश्न विचारले तर निर्लज्जपणे पुढे निघून जातात, अशी टीकाही ठाकरेंनी केली.
राम मंदिराचा प्रश्न आम्ही काढला तर सिंचन घोटाळा करणाऱ्यांच्या पोटात का मुरडा येतो, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला. भाजपने राम मंदिर हाही जुमला होता, हेही जाहीर करावे, असं सांगत पुन्हा टीकेचा रोख भाजपकडे वळवला. राम मंदिरासाठी ज्या विटा जमवल्या होत्या, त्या मंदिरासाठी नव्हत्या. त्या सत्तेकडे जाणाऱ्या पायऱ्या होत्या, असा टोला त्यांनी लगावला.ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवताना सांगितले की, शिवसेनाप्रमुखांशी कसं राजकारण खेळले, ते मला माहीत आहे. राम मंदिर जुमला होता, हे जाहीर करा. मग तुम्ही २८० वरुन २ वर आल्याशिवाय राहत नाही.