भाजप शिवसेना सरकारची चार वर्ष जनतेच्या फसवणुकीचीः खा. अशोक चव्हाण
औरंगाबाद : भाजप शिवसेना सरकारच्या चार वर्षाच्या काळात राज्याची दुरावस्था झाली आहे. सरकारच्या कामगिरीवर राज्यातला एकही घटक समाधानी नाही. राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारची चार वर्ष जनतेच्या ‘फसवणुकीची चार वर्ष’ आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
औरंगाबाद येथे बोलताना खा. चव्हाण यांनी भाजप शिवसेना सरकारच्या चुकाच्या धोरणाचा पंचनामा केला. भाजप शिवसेनेच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात झालेली दुरावस्था दाखवणारी ध्वनीचित्रफित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेच्या सोशल मिडीया विभागाने तयार केली आहे त्याचे प्रकाशन खा. अशोक चव्हाण व मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. निवडणुकीत भाजपने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत “मेरे अच्छे दिन कब आयेंगे” असा प्रश्न काँग्रेस पक्षाने ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून सरकारला विचारला आहे त्या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन मल्लिकार्जुन खर्गे व खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजप शिवसेना सरकारचा अंतिम काळ आता सुरु झाला असून जनताच या सरकारची शेवटची घंटा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून वाजवेल असा विश्वास व्यक्त करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घंटा वाजवून या सरकारच्या अंताची सुरुवात झाली आहे असे प्रतिकात्मक स्वरूपात घोषीत केले. हा घनघोर संघर्षाचा बिगूल आहे. काँग्रेसने सुरु केलेली लढाई जनतेची असून काँग्रेस ही लढाई जिंकेल असा निर्वाळा खा. चव्हाण यांनी दिला .