२५० महसुली मंडळांत राज्याच्या तिजोरीतून दुष्काळाची मदत देणार : चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतरही काही तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे अशा तालुक्यांना दुष्काळाची मदत देता यावी, यासाठी ज्या महसूली मंडळांमध्ये मध्ये ७५० मिमीपेक्षा कमी व सरासरी पेक्षा ७५ टक्के कमी पाऊस झाला असेल, अशा २५० मंडळांमध्ये दुष्काळाची मदत राज्याच्या तिजोरीतून देण्यात येईल, येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शासनाने काल केंद्र सरकारच्या निकषान्वये राज्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. पण यातील काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची तीव्रता अधिक आहे; त्यामुळे त्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत झाला नव्हता. त्यामुळे त्यांनाही दुष्काळी मदत मिळावी; यासाठी मंडलाचा निकष निश्चित करुन, राज्यातील ज्या मंडळांमध्ये ७५० मिमीपेक्षा कमी व सरासरी पेक्षा ७५ टक्के कमी पाऊस झाला आहे, अशा २५० मंडळांनाही दुष्काळी मदत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळातील बैठकीत घेण्यात आला.
या सर्व मंडलांना केंद्र सरकारच्या निकषानुसार मदत देता येऊ शकत नसल्याने, एनडीआरएफच्या नियमांनुसार राज्याच्या तिजोरीतून मदत दिली जाईल, असे महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, शासनाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे १५१ दुष्काळग्रस्त तालुके आणि २७० मंडळांमध्ये शासनाच्या आठ सवलती देण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, गेल्या वर्षी विदर्भात बोंडआळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ३३०० कोटी रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. केंद्र सरकारच्या निकषांमुळे ही सर्व मदत राज्याच्या तिजोरीतून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार, यातील शेवटचा हप्ता देखील संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.