धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान

धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान

मुंबई : धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होईल; तर मतमोजणी १० डिसेंबर रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेची मुदत २९ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ४ लाख ४६ हजार ९४ असून मतदारांची संख्या सुमारे ३ लाख २९ हजार ५६९ आहे. एकूण १९ प्रभागातील ७४ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३७ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत.

अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील २९ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ३ लाख ४६ हजार ७५५ असून मतदारांची संख्या सुमारे २ लाख ५६ हजार ७१९ आहे. एकूण १७ प्रभागातील ६८ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३४ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दोन्ही महानगरपालिकांसाठी १३ नोव्हेंबर २०१८ पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल.९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : १३ ते २० नोव्हेंबर २०१८
• नामनिर्देशनपत्रांची छाननी : २२ नोव्हेंबर
• उमेदवारी मागे घेणे : २६ नोव्हेंबर पर्यंत
• निवडणूक‍ चिन्ह वाटप : २७ नोव्हेंबर
• मतदान : ९ डिसेंबर
• मतमोजणी : १० डिसेंबर

Previous article२५० महसुली मंडळांत राज्याच्या तिजोरीतून दुष्काळाची मदत देणार : चंद्रकांत पाटील
Next articleपंकजा मुंडेंच्या हस्ते न्यूयॉर्क मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण