राजकारण्यांनी पूर्ण करता येत असतील तीच आश्वासने द्यावीत :श्रीमंत छत्रपती शाहू महाराज 

राजकारण्यांनी पूर्ण करता येत असतील तीच आश्वासने द्यावीत :श्रीमंत छत्रपती शाहू महाराज 

राजर्षी शाहू महाराज समतेचे प्रणेतेः खा. अशोक चव्हाण

दिमाखदार सोहळ्यात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

 नांदेड : मी मागील अनेक वर्षांपासून अशोकराव चव्हाण यांची कार्यशैली पाहतो आहे. त्यांना जे करणे शक्य आहे तीच आश्वासने ते देतात. राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचे त्यांनी दिलेले आश्वासन एक वर्षाच्या आत पूर्ण केले. अलिकडच्या काळात राजकीय नेते भरमसाठ आश्वासने देतात पण ती पाळत नाहीत. यातून जनतेचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे आश्वासने पाळणे शक्य असतील तरच ती द्यावीत. असा सल्ला राजकीय नेत्यांना देताना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता टोला लगावला.

नांदेड महापालिकेच्या वतीने नांदेड शहरात राजर्षी शाहू महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांचे काम जात, धर्म, पंथ, प्रांत यांच्या सीमेबाहेरचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील परिस्थिती आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या काळातील परिस्थिती वेगवेगळी होती. परिवर्तनाचे वारे देशात वाहत होते त्यावेळी पुरोगामी विचारांना पुढे नेण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. १९०२ साली प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे, समाजातील वंचित घटकांना आरक्षण, महिलांना शिक्षण आदी महत्त्वाचे निर्णय घेतले. आपल्या करवीर संस्थानात जातीवाद नष्ठ करून समानता आणण्याचे काम केले. त्यांनी जात धर्मापलिकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला म्हणूनच त्यांचे पुतळे देशाच्या वेगवेगळ्या भागासोबतच संसदेच्या परिसरात सुद्धा बसविण्यात आले. या पुतळ्याच्या माध्यमातून समाजामध्ये त्यांचे विचार रूजविण्यासाठी प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.

खा. अशोक चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण यांचे आणि माझे घरोब्याचे संबंध होते. त्यांना मी राज्याचे मुख्यमंत्री असताना कोल्हापूर आणि मुंबईत तर देशाचे गृहमंत्री असताना दिल्लीत अनेकदा भेटलो. मागासलेला मराठवाडा विकसित करण्याची त्यांची भूमिका होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खा. अशोक चव्हाण काम करत आहेत. नांदेडचे भव्य विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय, प्रशस्त रस्ते, भव्य प्रशासकीय इमारती, समाजाला प्रेरणा देणारे विविध राष्ट्रपुरुषांचे पुतळे हे त्यांच्या कामाची साक्षी देतात. मंत्री ते मुख्यमंत्री या काळात अशोकराव चव्हाण यांनी केलेले काम उत्कृष्ठ असल्याचे प्रशस्तीपत्र त्यांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या करवीर संस्थानात समाजसुधारणेचे वेगवेगळे प्रयोग केले. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आरक्षण लागू केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. महिलांसाठी व बहुजनांसाठी त्यांनी केलेले काम महाराष्ट्रच नव्हे तर हा देश कधीही विसरणार नाही. राजर्षी शाहू महाराज समतेचे प्रणेते होते. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या करवीर संस्थानात लोकशाहीची सुरुवात केली. मागासवर्गीयांना अधिकार दिले. महिलांच्या हक्काचे कायदे केले. बहुजनांच्या हितासाठी पुढाकार घेतला असे ते म्हणाले.

मला जे करणे शक्य आहे. त्याचेच आश्वासन मी देतो. या शहरात राजर्षी शाहू महाराज यांच्यासह अन्य काही राष्ट्रपुरुषांचे पुतळे व्हावेत यासाठी काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये आम्ही वचन दिले होते. त्यातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यामुळे आपण ती वचनपूर्ती केली.  याचे आपल्याला समाधान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये अनंत अडचणी आल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुतळ्याच्या उभारणीसाठी अनेक परवानग्या लागतात त्या मिळवण्यात आल्या. सगळ्यात आधी जागेची समस्या होती. परंतु तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन कृषी विद्यालयाची जागा महापालिकेला दिली. त्यामुळे त्यांचे विशेष आभार खा. अशोक चव्हाण यांनी मानले.

Previous articleजनतेच्या हितासाठी सत्ता कुणाचीही असली तरी पाठिंबा देऊ
Next articleपुणे नगर नाशिक सातारा भागात पावसाची शक्यता