वाघिणीने ठार केलेल्या महिलांचाही मला विचार करावा लागतो : मुनगंटीवार
मुंबई:अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच चिघळले असून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कडक ताशेरे ओढले होते. शिवसेनेनेही सामना संपादकीयातून अवनीच्या मृत्यूबद्दल सरकारवर कडक टीका केली. त्याला मुनगंटीवार यांनी आज उत्तर दिले असून वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांचाही मला विचार करावा लागतो, असा टोला लगावला आहे.
मनेका गांधी यांनी केलेले आरोप माहिती नसल्याच्या अज्ञानातून आहेत. वाघाला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या धोरणानुसारच हा निर्णय घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.पाच जणांचे बळी वाघिणीने घेतले तेव्हाच तिला पकडण्याचे आदेश दिले होते. पण प्राणीप्रेमी कोर्टात गेले, त्यांनी स्थगिती मिळवली आणि बळींचा आकडा १३ वर गेला, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.