वाघीण मृत्यू प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांचा राजीनामा मागणे चुकीचे
मुख्यमंत्र्यांनी केली मुनगंटीवारांची पाठराखण
मुंबई: अवनी वाघिणीला ठार मारण्याचा वन खात्याने घेतलेला निर्णय योग्यच असून, या प्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. त्याचबरोबर वाघिण मृत्यु प्रकरणी भाजपची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेलाही परस्पर उत्तर दिले आहे.
१३ जणांचा बळी घतलेल्या नरभक्षक अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर सर्वच बाजूंनी वनमंत्री मुनगंटीवार यांना लक्ष केले जात आहे. या प्रकरणी शिवसेनेने टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तर वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.या प्रकरणात आता मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करीत वनमंत्र्यांची पाठराखण केली आहे.अवनी मृत्यु प्रकरणावरुन मुनगंटीवारांचा राजीनाम्याची मागणी करणाऱ्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना आपण भेटणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस स्वत:च आता वनमंत्र्यांच्या बचावासाठी मैदानात उतरल्याने हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांनी येत्या मंत्रिमंडळ बैठकीत अवनी हत्येचा मुद्दा आक्रमकपणे मांडून सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरण्याचे आदेश आपल्या मंत्र्यांना दिले. यामुळे भाजप आणि सेनेत चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.शिवसेनेने सामना मध्ये अग्रलेख लिहून वाघिण हत्या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली होती. सरकारने वाघिणीला भेकडाप्रमाणे ठार मारले, असा आरोप केला होता. तसेच ज्या राज्यात माणसांना जगता येत नाही त्या राज्यात वन्य प्राण्यांची काय कथा, अशी बोचरी टीका केली होती. पण आता ठाकरे यांनी वाघिणीच्या मृत्युप्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा जोरकसपणे मांडून सरकारला सळो की पळो करुन सोडा, असे आदेशच मंत्र्यांना दिले आहेत. आता भाजप शिवसेनेला तसेच उत्तर देणार की शांतच राहणार, याची उत्सुकता आहे.