राज यांचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंना फटकारे !
मुंबई:मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दररोज आपल्या व्यंगचित्रांद्वारे राज्य सरकारवर तिखट टीका करत आहेत. पाडव्यानिमित्त काढलेल्या व्यंगचित्रात राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांना साडी नेसून शेतकऱ्याला ओवाळताना दाखवले आहे. शेतकऱ्याची पत्नी आपल्या पतीला यांना एका दमडीचीही ओवाळणी टाकू नका, असे दरडावताना दाखवले आहे.
मुख्यमंत्री आणि उद्घव ठाकरे यांना साडी नेसून ओवाळताना दाखवल्याने भाजप आणि शिवसेना यांचा संताप होण्याची शक्यता आहे. आता हे दोन्ही पक्ष राज यांना कशा प्रकारे उत्तर देतात, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
पिकाला योग्य हमीभाव, कर्जमाफी वगैरे अनेक आश्वासने देऊन सरकार सत्तेत आले. पण एकही आश्वासन सरकारने पाळले नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा नाराज आहे. तीच नाराजी शेतकऱ्याची पत्नी व्यक्त करत आहे, असे राज यांनी दाखवले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन सरकार तुम्हाला ओवाळेल, पण त्यांना मतांची ओवाळणी घालू नका, असे राज यांनी यातून सुचवले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना हे व्यंगचित्र चांगलेच झोंबणार आहे. शिवसेना ही बोचरी टीका कशी घेते, याची उत्सुकता आहे.