कर्नाटकी कशिदा २०१९ला दिसेल का?

कर्नाटकी कशिदा २०१९ला दिसेल का?

शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई:कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानिमित्ताने शिवसेनेने सामना मधून मित्र पक्ष भाजपवर निशाणा साधला आहे. कर्नाटकी कशिदा जगभरात प्रसिद्घ आहे. हीच कला २०१९ च्या निवडणुकीत दिसणार का, असा टोला शिवसेना प्रमुख उद्घव ठाकरे यांनी लगावला आहे.

ठाकरे यांनी म्हटले आहे की, २०१४ मध्ये भाजपने २८२ जागा जिंकून सर्वांना चकित केले. तेव्हापासून झालेल्या सर्व पोटनिवडणुकांत भाजपचे संख्याबळ घटून २७२ वर आले आहे. कर्नाटकमध्ये पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. हाच कर्नाटकी कशिदा राजकीय पटलावर अवतरला असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवांची मालिका सुरुच आहे. उत्तर प्रदेशापासून ती सुरु झाली. मतांची फाटाफूट हाच भाजपच्या विजयाचा पाया आहे आणि ती होऊ द्यायची नाही, असे भाजपविरोधी पक्षांनी ठरवलेले दिसतेय. बसपा आणि सपाने उत्तर प्रदेशात एकत्र येऊन जे केले तेच कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसने केले, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील विजय कॉंग्रेसच्या निष्प्राण देहात प्राण फुंकणारा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भाजपचे जोडतोड आणि फोडाफोडीत प्राविण्य असलेले पांडित्य आता का काम करत नाही, असा प्रश्न सरकार समर्थकांनाही पडला असेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. राम मंदिर, समान नागरी कायदा अशा मुद्यांपासून दूर जाण्याचा हा परिणाम असू शकतो . चार वर्षांतच जनाधााराचे हे काय झाले, असे भाजपला वाटत असेल, अशी टोलेबाजी ठाकरे यांनी अग्रलेखातून केली आहे.

Previous articleपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी दिल्या एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा
Next articleविरोधी पक्षनेत्यांचे दुष्काळातही खोटारडे राजकारण